संघर्षाची मशाल पेटली
चित्रा न्युज प्रतिनिधी
पुसद :-जिल्हा यवतमाळ येथे आजाद समाज पार्टी (कां.) तर्फे आयोजित भव्य जाहीर पक्षप्रवेश सोहळा शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सामाजिक न्याय, संविधान आणि वंचितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आजाद समाज पार्टी (कां.)च्या संघटनात्मक मजबुतीच्या दृष्टीने हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करत संविधान रक्षणाची व सामाजिक समतेसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याची शपथ यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी घेतली.
कार्यक्रमाची प्रस्तावना व प्रभावी सूत्रसंचालन शशांक खंदारे यांनी केले. प्रास्ताविकात आजाद समाज पार्टी (कां.)चे युवा जिल्हाध्यक्ष राजकुमार भगत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत,
“भाई चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वाखाली आजाद समाज पार्टी (कां.) ही संविधान, दलित, वंचित, शोषित आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढणारी ताकद आहे. येणाऱ्या काळात हा संघर्ष अधिक व्यापक होईल,” असा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष अशोक भाऊ भालेराव यांनी भूषवले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी भाई चंद्रशेखर आजाद (राष्ट्रीय अध्यक्ष – भीम आर्मी व आजाद समाज पार्टी कांशीराम) यांच्या नेतृत्वाखाली भीम आर्मी व आजाद समाज पार्टी (कां.) यांचा संयुक्त संघर्ष देशभरात मजबूत होत असल्याचे सांगितले. तसेच नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी मनःपूर्वक स्वागत केले.
या सोहळ्यात शेकडो कार्यकर्त्यांनी आजाद समाज पार्टी (कां.)मध्ये अधिकृत प्रवेश केला. यावेळी संघटनात्मक जबाबदाऱ्या जाहीर करण्यात आल्या.
विशाल भाऊ डाके यांची आजाद समाज पार्टी (कां.) युवा जिल्हा महासचिव, यवतमाळ पदी निवड जाहीर करण्यात आली. तसेच
शशांक खंदारे यांची आजाद समाज पार्टी (कां.) युवा तालुका संघटक (ग्रामीण) व शेंबाळपिंपरी सर्कल प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाला शरद खंदारे, आजाद समाज पार्टी काशीराम पुसद युवा तालुका अध्यक्ष (ग्रामीण) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी जिल्ह्यात संघटन वाढीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने, निष्ठेने आणि बाबासाहेबांच्या विचारांवर चालत काम करण्याचे आवाहन केले. हा पक्षप्रवेश सोहळा म्हणजे आजाद समाज पार्टी (कां.)च्या संघटनात्मक वाटचालीतील एक निर्णायक टप्पा असून, भाई चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात यवतमाळ जिल्ह्यातील राजकारणावर याचा निश्चितच प्रभाव पडेल, असा विश्वास उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला आकाश चवरे, शरद खंदारे, सिद्धार्थ बरडे, अश्विन कांबळे, राहुल धुळे, करण खंदारे, स्वयम इंगळे, वैभव खरतडे, निलेश जाधव, संदीप जाधव, निशांत कांबळे, निखिल कांबळे, करण धवसे, विक्रांत उत्तमराव डाके, अमोल खंदारे, अनिकेत खंदारे, शांतीशील जाधव, वैभव सूर्यवंशी, राज कांबळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या