Ticker

6/recent/ticker-posts

अवैध देशी दारूचा ग्रामीण भागात महापूर

दारूमुळे युवक कामगार, शिक्षण घेणारी मुलेही व्यसनाधीनतेच्या विळख्यात


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : शहरातील देशी दारू भट्टीतून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अवैध देशी दारूचा पुरवठा केला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चेदनखेडा, काटवल, कोंढेगाव, मुधेली, आष्टा, विलोडा, मोहुर्ली, चोरा, गुळगाव, वायगाव, चिचोली, घोडपेठ आदी गावांसह इतर ग्रामीण भागात हा अवैध धंदा सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

या अवैध दारू पुरवठ्यामागे टप्पा परिसरातील एका कंत्राटी देशी भट्टी मालकाचा हात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित भट्टी मालकाने तब्बल ८ ते १० सप्लायर नेमले असून, दररोज पहाटे तसेच रात्री १० वाजल्यानंतर दुचाकी व चारचाकी वाहनांद्वारे गावागावांत दारू पोहोचवली जात असल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणी तर घरपोच सेवा दिली जात असल्याने हा अवैध व्यवसाय अधिकच फोफावत आहे.

गावांमध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या देशी दारूमुळे युवक, कामगार तसेच शिक्षण घेणारी मुलेही व्यसनाच्या आहारी जात असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. परिणामी अनेक कुटुंबांचे आर्थिक व सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात दारू सोडण्यासाठी औषध घेतल्यानंतर काही व्यसनाधीनांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्याचे सांगितले जाते. तरीही प्रशासनाने या अवैध विक्रीवर प्रभावी अंकुश आणलेला नसल्याचा आरोप होत आहे.

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्रीसाठी पुरवठा करणाऱ्या संबंधित देशी भट्टी मालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करून या अवैध साखळीचा छडा लावावा, अशीही मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, प्रशासन या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर ठोस पावले उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या