चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली :- स्थानिक बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भूमी साकोली (जि. भंडारा ) येथे पंचशील महिला मंडळ, साकोली आणि बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती, साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय दिपक साखरे होते .प्रमुख अतिथी म्हणून आयुष्यमती सुषमा रामटेके व आयुष्यमती संगीता मेश्राम उपस्थित होत्या. प्रमुख वक्त्या आदरणीय स्मिता मेश्राम होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजा उपस्थित मान्यवर अध्यक्ष व अतिथींनी करून माल्यार्पण केले. तसेच उपस्थित उपासक व उपासिका यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. मंचावरील उपस्थित सर्व सन्माननीय अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .
याप्रसंगी ' सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य ' या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.या प्रश्नमंजुषा स्पर्धेत सर्व वयोगटातील एकूण १६ स्त्री पुरुषांनी सहभाग घेतला. प्रश्नमंजुषा स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना क्रमाक्रमाने ' सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य ' या विषयावर प्रा. डॉ. शंकर बागडे यांनी प्रश्न विचारले. प्रश्नाचे योग्य उत्तर देणाऱ्या स्पर्धकांना गुण देण्यात आले.या प्रश्नमंजुषा स्पर्धेत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारीत एकूण ५० प्रश्न विचारले होते. यापैकी ज्या स्पर्धकांनी अधिकाधिक प्रश्नांची उत्तरे दिली. अशा दोन स्पर्धकांना विजयी घोषित करण्यात आले. यामध्ये पुरुष गटातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पी. एस. बोदेले यांना पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्षा अॅड. स्मिता मेश्राम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. स्त्रियांच्या गटातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आयुष्यमती संगीता मेश्राम यांना बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती साकोलीचे अध्यक्ष सन्माननीय दिपक साखरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.विशेष म्हणजे दोनही विजेत्यांना पारितोषिके डॉ. शंकर बागडे यांच्याकडून देण्यात आली. यावेळी प्रमुख वक्त्या आदरणीय स्मिता मेश्राम यांनी आपल्या ओजस्वी शब्दातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर अमूल्य असे मार्गदर्शन केले. तसेच आदरणीय दिपक साखरे यांनी समयोचित असे अध्यक्षीय भाषण केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शंकर बागडे यांनी केले.गुणदानाचे कार्य सन्माननीय अशोकजी रंगारी यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन आयुष्यमती कविता मडामे यांनी केले.याप्रसंगी साकोली येथील स्त्री पुरुषांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचशील महिला मंडळाच्या आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती साकोलीच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.


0 टिप्पण्या