चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली :-मूळ निवासी असलेल्या बेरोजगारांना व्यवसायासाठी जागा मिळावी ही भूमिका यापूर्वी नगर परिषदेत निवडणुकीपूर्वी घेण्यात आली होती. मात्र या भूमिकेत आता दिवसेंदिवस बदल होतांना दिसत असून रोजगार करिता टीनाचे शेड उभ्या केलेल्या दुकानदाराला साकोली नगर परिषद कडून हेतू परस्पर नोटीस बजावण्यात आली आहे. विशेष म्हणजे या टीनच्या शेडमुळे कुणाचेच नुकसान नाही, आडकाठी नाही, अडचण नाही, गैरसोय नाही. असे असतांना हेतू परस्पर नोटीस बजावल्याने रोजगारासाठी नव्याने पाऊल टाकलेल्या युवकांनी इतकेच नव्हे तर परिसरातील नागरिकांनीसुद्धा संताप व्यक्त केलेला आहे.
सविस्तर वृत्त असे की, एकोडी फाटा ते तलाव वॉर्ड असा बायपास रस्ता तयार करण्यात आला. त्यामुळे आधीपासून या जागेत रहीवासी असलेल्या बावणे कुटुंबाने मोकळ्या जागेत भरण भरून उदरनिर्वाहसाठी जागा तयार केली आणि टीनाचे शेड टाकून दुकानाची तयारी केली. मोक्याच्या ठिकाणी हे दुकान सुरू होणार असल्याने बावणे कुटुंबाचा उदरनिर्वाहचा प्रश्न सुटणार होता. या दुकानाचे काम देखील अंतिम टप्प्यात आले. अश्यावेळी
अतिक्रमण हटवून बांधकाम थांबण्याची नोटीस साकोली नगर परिषदेने बजावली. यात नगरपरिषदला इतकी घाई झाली की सात दिवसानंतर दुसरी नोटीस बजावण्याचा अलिखित नियम असतांना साकोली नगरपरिषदने केवळ दोनच दिवसात दुसरी नोटीस बजावली. यावरून साकोली नगरपरिषद विकास कामांमध्ये किती अग्रेसर आहे हे आता दिसून येत आहे. याच तलाव पाळीवर नगर परिषदेने नजर घातली तर ताराच्या कुंपणासह पक्के बांधकाम केल्याचे दिसून येईल. मात्र फक्त बावणे कुटुंबांच्या भावंडांना नोटीस बजावून नगरपरिषने काय साध्य केले ? असा सवाल आता साकोली येथील नागरिक करीत आहेत. तलाव पाळीवर दोन्ही बाजूला अतिक्रमण आहे. पाटबंधारे विभाग परिसरात अतिक्रमण आहे. आठवडी बाजारात अतिक्रमण आहे. मग यांना नोटीस नगरपरिषद प्रशासन का देऊ शकली नाहीत ? तरुण युवक जर व्यवसायात समोर येत असेल आणि त्यांना केवळ अतिक्रमण नोटीसाचे बुजगावणे दाखवीत असतील तर हा अन्याय युवकांनी सहन का करावा ? बावणे कुटुंबाच्या पाठीशी आता रोजगार युवक पाठीशी उभे राहिले असून नगर परिषदेने हिम्मत असेल तर अतिक्रमण काढून दाखवावे असा सज्जड इशारा आता मूळ निवासी रोजगार युवक संघटने दिलेला आहे.
_____________________________________________
माझा फर्निचरचा व्यवसाय आहे. व्यवसायाला उभारणी देण्यासाठी मी टिनाचे शेड टाकले. यामुळे कुणालाही अडचण नाही. इतर नागरिकांनी ताराचे कंपाऊंड करून आणि पक्के बांधकाम करून घेतले. मी फक्त टीनाचे शेड टाकले जे केव्हाही काढता येते. मात्र नगर परिषदने पक्के बांधकाम करीत असल्याची नोटीस बजावली. जे दुकान माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाचे साधन आहे. सगळीकडे अतिक्रमण करून रस्त्या रस्त्यावर दुकाने थाटले असतांना मला मात्र हेतू परस्पर आणि आकस बुद्धीने नोटीस बजाविन्यात आली. माझ्या दुकानामुळे कोणतीही, कोणाचीही अडचण नाही आणि गैरसोय नाही.
संजय बावणे.
रोजगार व्यवसायिक, साकोली
_____________________________________________
अतिक्रमण हटाव या मोहिमेत मी सुद्धा सहभागी आहे. परंतु गावाच्या मूळ निवासीला व्यवसाय करिता आधी प्राधान्य देणार आहे. अन्यथा साकोली सेंदुरवाफा शहरातील सर्वच शासकीय भूखंडावरील अतिक्रमणे तातडीने हटविण्यात येतील.
सपन कापगते.
नगरसेवक प्रभाग क्र. १०
______________________________________________
साकोलीतील मूळ निवासी असलेल्या बेरोजगार युवकांना प्रथम जागा उपलब्ध करून देण्यात यावी ही आमची यापूर्वी मागणी राहिलेली आहे आणि समोरही राहणार आहे. अतिक्रमनामुळे कोणाचीही अडचण होऊ नये ही प्रामाणिक भूमिका आहे. यापूर्वी गैरसोय ठिकाणी अनेक ठिकाणी अतिक्रमण करून व्यवसाय उभारला. बावणे भावंडानी त्यांच्याच जागेत टीनाचे शेड व्यवसायासाठी उभारले. ज्यामुळे कुणालाही त्यापासून अडचण नाही. असे असतांना नगरपरिषदेने हेतू परस्पर नोटीस बजावणे हे चुकीचे आहे. व्यवसायासाठी समोर आलेल्या या भावंडावर हा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक आघात आहे.
रवि भोंगाने.
सामाजिक कार्यकर्ता, साकोली


0 टिप्पण्या