Ticker

6/recent/ticker-posts

आनंद निकेतन महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

चित्रा न्युज प्रतिनिधी 
 चंद्रपूर:-जागतिक महिला दिनानिमित्त   आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे महाविद्यालयातील विद्यार्थी (मुलं) यांच्या पुढाकारातून महिलांप्रती कृतज्ञता व सन्मान व्यक्त करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून समाजसेविका मा. पल्लवीताई आमटे यांची उपस्थिती लाभली, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे हे होते. कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयातील महिला प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला. तसेच महिला प्राध्यापकांसाठी विविध खेळ व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी पल्लवीताई आमटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, *“आजही आपण स्त्री-पुरुष या भेदात अडकून राहिलो आहोत.* *माणूस म्हणून कधी जगणार, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा,”* असे प्रतिपादन केले. त्यांच्या या विचारांनी विद्यार्थ्यांना सामाजिक समतेचा संदेश मिळाला.
प्राचार्य डॉ.मृणाल काळे यांनी आपल्या मनोगतात महिलांचे समाज व शिक्षण क्षेत्रातील योगदान अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी महिलांप्रती आदर आणि समानतेची भावना जोपासावी, असे आवाहन केले.
याप्रसंगी उपस्थित महिला प्राध्यापकांनीही आपले मनोगत व्यक्त करत जीवनातील अनेक अनुभव, अडचणी तसेच कुटुंब व समाजाकडून मिळालेल्या सहकार्याबाबत आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुकही केले.
कार्यक्रमास प्रा. मोक्षदा मनोहर, प्रा. संयोगिता वर्मा, प्रा.विद्या दडमल, प्रा.सरोज सहारे, प्रा. प्रियंका भुक्या, प्रा. कल्याणी आत्राम, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. धनश्री पंचभाई, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश राठोड  उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी मयूर हनवते यांनी  तर आभार  रुपेश उत्तरमारे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या