Ticker

6/recent/ticker-posts

प्रीती कापगते यांना गोंडवाना विद्यापीठाची आचार्य पदवी प्रदान

झाडीबोलीतील चार कवींच्या निवडक कविता संशोधन विषय


 रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली: गोंडवाना विद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्या शाखे अंतर्गत मराठी विषयात साकोली तालुक्यातील जांभळी  येथील प्रीती दोजराम कापगते यांना आचार्य (पी. एचडी.) पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय "झाडीपट्टीतील निवडक कवींच्या कवितांचा चिकित्सक अभ्यास" असून डॉ. हरिश्चंद्र बोरकर, अंजनाबाई खुणे, हिरामण लांजे आणि डोमाजी कापगते यांच्या निवडक कवितासंग्रहांच्या संदर्भात हा विषय आहे. प्रीती कापगते यांचे सासर चांदोरी असून त्यांचे सासरचे नाव प्रीती किशोर हातझाडे असे आहे. त्यांनी झाडीपट्टीतील बोलीमहर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर, झाडीपट्टीची बहिणाबाई अंजनाबाई खुणे, सुप्रसिद्ध कवी व साहित्यिक हिरामण लांजे तसेच अल्पशिक्षित पण प्रतिभाशाली संतकवी डोमाजी कापगते यांच्या  कवितासंग्रहांतील निवडक कवितांचा अभ्यास करून आपला प्रबंध विद्यापीठाला सादर केला व विद्यापीठाने तो मंजूर करून त्यांना आचार्य पदवी प्रदान केली. झाडीपट्टीतील साहित्यिकांसाठी ही अतिशय प्रेरणादायी आणि गौरवास्पद बाब आहे. झाडी बोली चळवळीतील या चारही ज्येष्ठ साहित्यिकांचे प्रीतीने खूप आभार मानले आहेत. या संशोधन कार्यासाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून डॉ. परमानंद बावनकुळे, प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख, चिंतामणी महाविद्यालय, पोम्भूर्णा, जि. चंद्रपूर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल त्यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.तसेच या यशामागे प्रीतीचे पती डॉ. किशोर हातझाडे यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय आईचे सतत आशीर्वाद, भाऊ-बहिणींची साथ तसेच दोन्ही मुले स्वरा आणि श्लोक यांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.  त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षकवर्ग तसेच सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या