प्रशासन लाचार की दुकानदार वरचढ ?
रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:-काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्गावरील हटविलेला गुजरी बाजार पुन्हा रस्त्यावर आला आहे. पुन्हा आम्ही आमच्या दारी म्हणत गुजरी दुकानदार प्रशासनावर वरचढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे " येरे माझ्या मागल्या आणि कन्या भाकरी चांगल्या " या जुन्या ग्रामीण भाषेतील म्हणीची आठवण दुकानदारांनी करून दिली. आता प्रशासन लाचार की दुकानदार वरचढ हा नवा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. सविस्तर वृत्त असे की, वाहन चालकांना आणि प्रवाशांना आपली वाहने ठेवतांना आणि पादचाऱ्यांना रस्त्यावर मांडलेल्या गुजरी बाजारामुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांनी ही कैफियत प्रसिद्धी माध्यमासमोर व्यक्त केली. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्रशासन, साकोली नगरपरिषद प्रशासन, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात हा गुजरी बाजार रस्त्यावरून हटविण्यात आला होता. त्यामुळे वाहन चालकांनी, नागरिकांनी प्रशासनाच्या धडक बे धडक कारवाईच्या बाबतीत समाधान व्यक्त केले होते. सदर गुजरी बाजार रस्त्यावरून हटविल्याने नागरिकांना खरेदी करता सोयीचे झाले होते. परंतु काही दिवसाचा कालावधी पार केल्यानंतर एका आजीबाईने आपल्या भाजीपाल्याचे दुकान हटखोरपणे प्रशासनालासुद्धा न जुमानता पुन्हा रस्त्यावर मांडला. त्यानंतर हळूहळू तीच पुनरावृत्ती सुरू झाली. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा संताप व्यक्त केला. मूठभर दुकानदारांसमोर प्रशासन लाचार झाले काय ? इथपर्यंत नागरिकांच्या प्रतिक्रिया प्रसिद्धी माध्यमांपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली. दुसरीकडे काही मोजक्या दुकानदारांनी आपली दुकानदारी पुन्हा रस्त्यावर आणल्याने आठवडी बाजारात बसलेल्या दुकानदार यांनी प्रशासनाच्या विरोधात आगपाखड करीत नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला. बसवायचे असेल तर सर्वांनाच एका ठिकाणी बसवा अथवा आम्ही देखील रस्त्यावर भाजीपाला घेऊन बसू. या कारणामुळे राष्ट्रीय महामार्ग प्रशासन, पोलीस विभाग आणि नगरपरिषद प्रशासनासमोर ही बाब आता गंभीरतेने समोर यायला लागलेली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील गुजरी मार्गाचा प्रशन नेहमी करिता मार्गी लावावा अन्यथा सर्व सामान्य नागरिकांकडून प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाचा मोठा लढा उभारणार असल्याचे संकेत आहेत.
----------------------------------------------
आमची आठवडी बाजारात दैनंदिन गुजरी करिता बसण्यास हरकत नाही. पण काही लोक पुन्हा रस्त्यावर येऊन बसले. त्यामुळे आमच्या भाजीपाला विक्रीवर परिणाम होतो. काही दुकानदार रस्त्यावर येऊन बसल्याने येणारा जाणारा आठवडी बाजारात येण्याची तसदी घेत नाही. तो बाहेरच्या बाहेर भाजीपाला विकत घेऊन निघून जातो. त्यामुळे भाजीपाला विक्रीवर परिणाम होतो.
गुजरी दुकानदार
-----------------------------------------------
ही प्रशासनाची लाचारी म्हणावी की गुजरी दुकानदाराचा हटखोरपणा म्हणावा. प्रशासनाने एकदा कारवाई केल्यानंतर दुकानदारांची हिंमत होते कशी ? प्रशासनाच्या कार्यात सातत्य असते तर गुजरी दुकानदार वरचढ झालेच नसते. प्रशासनाचे कार्य हतबलपणे चालत असेल तर दुकानदार वरचढ होणारच. परंतु आमच्यासारख्या रुग्णवाहिका चालकांना आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो. बायपास रस्ता हा गुजरीसाठी नाहीच. हा प्रश्न नेहमीसाठी मार्गी लावावा. ही नगरपरिषद, पोलीस विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून अपेक्षा आहे.
सचिन घोनमोडे.
रुग्णवाहीका चालक. ( शिंदे गट )


0 टिप्पण्या