जि. प. शाळेतील मयूरला तालुक्याचा सलाम
चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली :-महाराष्ट्राचे सत्ताधारी सरकार जरी जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष घालायला तयार नसले तरी विद्यार्थी मात्र आपल्या मेहनतीच्या बळावर जिल्हा परिषद शाळेचे नाव चमकवित आहेत. साकोली तालुक्यातील चीचगाव येथील मयूर कोल्हे याने अनुसूचित जातीतून महाराष्ट्र राज्यातून दुसरा येण्याचा बहुमान मिळवला आहे. परिणामी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून अनेक विद्यार्थी तालुक्याचे नाव लौकिक करीत आहेत हे विशेष. मागील वर्षी खंडाळा ( बोंडे ) येथील ओंकार देवेंद्र लांजेवार या विद्यार्थ्यांने सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केलेली होती. तो सध्याला गोंदिया येथे अन्नपुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. या वर्षी साकोली तालुक्यातील चिचगाव ( सराटी ) येथील मयूर उद्धव कोल्हे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुसूचित जातीतून राज्यातून द्वितीय स्थान मिळवले. त्याने मुद्रांक निरीक्षक राज्यकर परीक्षेत हे यश संपादन केले. त्यामुळे तालुक्यातील, विशेष म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी- विद्यार्थिनी शहरी भागापेक्षा कुठेही मागे नाहीत हे या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेले आहे. साकोली तालुक्यातील सराटी गावाजवळील जंगल परिसरातील चीचगाव. साकोली तालुक्याच्या ठिकाणाहून केवळ ७ ते ८ किलोमीटर अंतरावर हे गाव. या गावात सध्या ७५ कुटुंबाचे वास्तव्य आहे. जिल्हा परिषद १ ते ४ या प्राथमिक शाळेत त्याने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यानंतर तो पुढे निघाला. बीएससी केल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. आई जिजाबाई आणि वडील उद्धव या दांपत्याचा हा मुलगा. मयूरच्या यशामागे त्याचे स्वतःचे कठोर परिश्रम असले तरी मात्र त्याच्या या यशामागे, मेहनतीच्या पाठीशी आई-वडिलासह भाऊ सुशील आणि बहीण मृणाली हे खंबीरपणे उभे होते हे विशेष. कुठल्याही अकॅडमीची किंवा शिकवणीची मदत न घेता त्याने या यशाचा पाठलाग केला आहे.
----------------------------------------------
निश्चिंतपणे मी कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाला ही माझ्या करिता, माझ्या शाळेकरीता आणि माझ्या शिक्षक वृंदांकरिता करिता अभिमानाची बाब आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, नव्हे ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा कुठेही मागे नाहीत हे सिद्ध झालेले आहे आणि हे वारंवार सिद्ध होत आहे. याही अगोदर आपण एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी बघितली तर अधिकाअधिक ग्रामीण भागातील विद्यार्थी दिसून आलेली आहेत. मी शाळेच्या वतीने मयुरचे अभिनंदन करून पुढील भविष्याकरिता सुयश चिंतितो.
संगमनाथ कंगारे. मुख्याध्यापक
जि.प. प्राथमिक शाळा चिचगाव ( सराटी )
पंचायत समिती साकोली.
----------------------------------------------
गावाची सरपंच या नात्याने मी मयूर आणि त्याच्या कुटुंबाचे कौतिक करते. मयूरने आपल्या गावाचा मान उंचावला यासारखी आणखी मोठी गोष्ट नाही. मयूर आमच्या गावाचा आण- बाण- शाण ठरलेला आहे. चीचगाव या ग्रामीण भागातील जंगलव्याप्त गावाला मयूरने मोठेपण मिळवून दिले. हमखासपणे आम्ही मयूरच्या स्वागताकरिता सज्ज आहोत. गावकऱ्यांच्या वतीने मयुरच्या पुढील प्रगतीला शुभेच्छा!
लता रामटेके.
सरपंच चिचगाव ( सराटी )
---------------------------------------------- . मयूरचा गौरव
साकोली मधील अग्रेसर संघटना व्हीएसएफ युनिट म्हणजे व्हीआयपी ग्रुप, साकोली मिडिया व फ्रिडम युथ फाऊंडेशन वतीने मयूरने परीक्षेत यश संपादन केल्यामुळे त्याचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या सत्कार प्रसंगी मयूरची आई जिजाबाई, वडील उध्दव, भाऊ सुशिल, बहिण मृणाली कोल्हे, शितल नागदेवे, अतुल नागदेवे, जयेश नागदेवे यांसह व्हीएसएफचे अनिल कापगते, डी. जी. रंगारी,आशिष चेडगे उपस्थित होते.


0 टिप्पण्या