चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली :- नागभीड तालुक्यातील कोथुळणा (जि. चंद्रपूर) येथील पंचशील चौकात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त प्रबोधन कार्यक्रम पुरुषोत्तम बगमारे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून पूनम बगमारे, राजकुमार शेंडे, रोशन कुर्जेकर होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते डॉ. शंकर बागडे यांनी प्रबोधनपर सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. शंकर बागडे भाषणात म्हणाले,परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतात की, माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा माझ्या दृष्टीने ज्या मोलाच्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्राणपणाने झटा. माझे अधुरे राहिलेले कार्य पूर्ण करा असा संदेश डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. तेव्हा डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मोलाच्या गोष्टी म्हणजे सारा भारत बौद्धमय करा. शासनकर्ती जमात बना, प्रशासनातील मोक्याच्या जागा पटकवा. आपल्या कमाईतील विसावा हिस्सा सामाजिक व धम्माच्या कार्यासाठी द्या. समता मूलक समाज निर्माण करा. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक उन्नती करा. समाजाला शिक्षित करा. समाजाला संघटीत करा. न्याय हक्कांसाठी संघर्ष करा. बौद्ध धम्माचे काटेकोरपणे पालन करा. आपल्या हिताबरोबर समाजाचेही हित करा. स्वाभिमानी व स्वावलंबी समाज निर्माण करा. या सर्व मोलाच्या गोष्टी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्या साध्य करण्यासाठी एकात्मतेने झटा असे आवाहन उपस्थित बंधूभगिनींना डॉ. शंकर बागडे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन जयबुद्ध रामटेके यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर युवा संघ, रमाई महिला मंडळ, बौद्ध समाज पंच कमिटी, कोथुळणा येथील समस्त पदाधिकारी आणि सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले


0 टिप्पण्या