Ticker

6/recent/ticker-posts

अखिल भारतीय ग्राहक पंचायत – विदर्भ प्रांत कार्यकारिणीची बैठक भंडाऱ्यात उत्साहात संपन्नभ


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :-अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक रविवार, १२ एप्रिल रोजी भंडारा येथील सन्नीज स्प्रिंगडेल स्कूलमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत संघटन बळकटीकरण, युवा सहभाग आणि सामाजिक प्रबोधन यावर विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन विश्व मांगल्य सभा यांच्या राष्ट्रीय संपर्क प्रमुख तसेच सन्नीज स्प्रिंगडेल स्कूलच्या कोषाध्यक्ष शुभांगी सुनील मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. नारायण मेहरे, पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री नितीन काकडे, उपाध्यक्ष श्रीपाद भट्टलवार, प्रांत संघटन मंत्री अभय खेडकर, प्रांत सचिव डॉ. चारुदत्त चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटक शुभांगी मेंढे यांनी आपल्या मार्गदर्शनात ‘पंचपरिवर्तन’ या संकल्पनेवर भर दिला. त्या म्हणाल्या, “आज मुले डॉक्टर-इंजिनिअर होत आहेत, परंतु कौटुंबिक संवादाचे काय? मातृभाषा, स्वदेशी वस्तूंचा वापर आणि कौटुंबिक प्रबोधन ही काळाची गरज आहे.” त्यांनी बुलेट ट्रेन आणि वंदे भारतचे उदाहरण देत ‘स्वदेशी’ जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले.

प्रांत अध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, संघटनच सर्वोच्च आहे आणि कोणतीही व्यक्ती संघटनेपेक्षा मोठी नाही. “संपर्क आणि संवाद हे फक्त चिंतेचे विषय नसून संघटनेचा पाया आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीदरम्यान घरगुती गॅस सिलेंडर, सोलर सिस्टीम आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

या बैठकीत संघटनेच्या शिस्तीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. नागपूर येथील माजी पदाधिकारी गणेश शिरोळे, संजय धर्माधिकारी, अनिरुद्ध गुठे व प्रकाश भुजाडे यांनी संघटनेच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करून नागपूरमध्ये समांतर कार्यकारिणी स्थापन करून संघटनविरोधी काम केल्यामुळे त्यांना संघटनेतून बहुमताने हकालपट्टी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

प्रांत सचिव डॉ. चारुदत्त चौधरी यांनी मागील तिमाहीचा अहवाल वाचन केला. त्यानंतर नागपूर, अकोला, वर्धा, भंडारा, यवतमाळ, वाशिम आणि चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधींनी आपल्या कार्याचा अहवाल सादर केला.

बैठकीदरम्यान ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी मिळताच संपूर्ण सभागृहाने दोन मिनिटे मौन पाळून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन रवींद्र तायडे यांनी केले, तर आयटी सेल प्रमुख चंद्रशेखर साठे यांनी संघटन मंत्र सादर केला. पर्यावरण प्रमुख संजय आयलवार यांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या आणि शांतिमंत्राने या प्रेरणादायी बैठकीचा समारोप झाला. आभार प्रदर्शन डॉ. जयश्री सातोकार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भंडारा जिल्हाध्यक्ष जयंत सब्जीवाले यांच्यासह दीप्ती कुरोडे, कृष्णा खेडीकर, अनिल शेंडे, चंद्रशेखर साठे, संजय आयलवार, प्रकाश कुरोडे आणि रमेश पारधी यांनी विशेष परिश्रम घेतले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या