Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईतील पायधुनीत एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू; कलिंगड, बिर्याणीचे नमुने तपासणीसाठी, पोलिसांचा सखोल तपास सुरू


चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंबई : पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार फूड पॉइझनिंगचा संशय व्यक्त केला जात असला, तरी मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी खाद्यपदार्थांचे नमुने आणि मृतांच्या शरीरातील व्हिसेरा तपासणीसाठी पाठवून सखोल चौकशी सुरू केली आहे.

मृतांमध्ये अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या दोन मुली आयशा व झैनब यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २५ तारखेच्या रात्री कुटुंबीयांनी नातेवाईकांसोबत एकत्र जेवण केले होते. रात्री उशिरा बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानंतर काही वेळातच चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला.

प्रकृती अचानक खालावल्याने सर्वांना तातडीने जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी सांगितले की, या घटनेची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. कुटुंबाने खाल्लेल्या बिर्याणी आणि कलिंगडाचे नमुने जप्त करण्यात आले आहेत. तसेच शवविच्छेदन करून व्हिसेरा नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

मृत्यूपूर्वी कुटुंबातील एका सदस्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर त्रास सुरू झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे फूड पॉइझनिंगची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी पोलिसांनी कोणतेही ठोस कारण अद्याप निश्चित केलेले नाही.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पोस्टमॉर्टेम आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. कलिंगडामुळे विषबाधा झाली की अन्य काही कारण आहे, याबाबत आता अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या धक्कादायक घटनेमुळे अन्नसुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याबाबतही प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांचा तपास सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या