कृषी विभागाची मोठी कारवाई: नागपूरहून मारेगावला जाणारा 22 लाखांचा संशयित बियाणे साठा पकडला; 6 लाखांचे वाहनही जप्त
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर :खरीप हंगाम तोंडावर असतानाच वरोरा कृषी विभागाने बोगस व संशयास्पद बियाणे विक्रीविरोधात मोठा दणका दिला आहे. नागपूर येथून मारेगावकडे बेकायदेशीररित्या नेला जाणारा 22 लाख 52 हजार 500 रुपये किमतीचा संशयित कापूस बियाण्यांचा साठा कृषी विभागाच्या पथकाने धाडसी कारवाई करत जप्त केला. वाहनासह एकूण 28 लाख 52 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या पथकाने 18 मे रोजी रात्री वरोरा-वणी रोडवरील नगर परिषदेच्या कचरा डेपोजवळ नाकाबंदी केली. नागपूरवरून मारेगावच्या दिशेने येणारे मालवाहू वाहन क्रमांक MH 49 AR 9622 थांबवून झडती घेतली असता मोठा साठा उघडकीस आला.
वाहनाची तपासणी केली असता त्यात प्लास्टिकच्या 50 गोण्या आढळल्या. या गोण्यांची तपासणी केली असता त्यात कापशी बियाण्यांचे तब्बल 22 हजार 500 पाकिटे दडवून ठेवल्याचे उघडकीस आले. या बियाण्याच्या वैधतेबाबत संशय असल्याने पथकाने तातडीने बियाण्यासह 6 लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करून वरोरा पोलिसांच्या स्वाधीन केले.
*शेतकऱ्यांनी सावध राहावे*
खरीप हंगाम सुरू होत असल्याने बोगस बियाणे विक्रीच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
खरीपापूर्वी मोठी कारवाई! 🚨 वरोरा कृषी विभागाचा दणका. नागपूर-मारेगाव रोडवर 22.52 लाखांचे संशयित कापूस बियाणे जप्त. 50 गोण्यांत 22,500 पाकिटे. 6 लाखांचे वाहन MH 49 AR 9622 सह 28.52 लाखांचा मुद्देमाल जप्त. 2 आरोपी ताब्यात. शेतकऱ्यांनो सावधान


0 टिप्पण्या