Ticker

6/recent/ticker-posts

उधारीचे पैसे मागितले म्हणून मद्यधुंद मित्राने केला सख्या मित्राचा खून!

सख्खा मित्र झाला वैरी! मध्यरात्री भंडारा शहरात थरार!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा : काही दिवसांपूर्वी  उसनवारीवर घेतलेली ३ हजार रुपयांची पूर्ण रक्कम मित्राने परत केली नाही. त्यावरून झालेल्या वादात मद्यधुंद मित्राने  पोटात चाकू भोसकून सख्या मित्राचा भर चौकात खून केला. ही घटना शहरातील संत जगनाडे चौकालगतच्या विघ्नहर्ता हॉटेलजवळ रात्री ११:२० ते ११:३० वाजताच्या सुमारास घडली. विशाल ऊर्फ रजत विजय लिमजे ( वय २८ वर्षे, लाला लजपत राय वॉर्ड, भंडारा) असे मृत तरुणाचे नाव आहे. अवघ्या काही तासातच पोलिसांनी गोविंद गोपाल नेवारे ( वय २६ वर्षे, देशबंधू वॉर्ड, हलधरपुरी, भंडारा) याला अटक केली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विशाल आणि गोविंद यांच्यात घट्ट मैत्री होती. या मैत्रीतून काही दिवसांपूर्वी विशालने गोविंदला ३ हजार रुपये उसने दिले होते; मात्र, वारंवार मागणी करूनही गोविंदने ती रक्कम परत केली नाही. काही दिवसांपूर्वी ५०० रुपये परत केले होते. उर्वरित अडीच हजार रुपयांसाठी विशालकडून गोविंदाकडे मागणी सुरूच होती. यातून दोघांमध्ये वाद होत असायचा. घटनेच्या रात्रीदेखील वाद झाल्यावर तो विकोपाला गेला. त्यामुळे ही खुनाची घटना घडली.

दारू प्यायले आणि वादात झाला घात

सोमवारी (दि.१८) रात्री दोघांनी एकत्र दारू प्यायली. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा पैशांवरून जोरदार वाद झाला. अशातच संतापलेल्या गोविंदाने घरी जाऊन चाकू आणला. यावेळी विशाल चौकातच होता. त्याला गाठून गोविंदाने त्याच्या पोटातच चाकू भोसकला. हा वार एवढा जोराचा होता की त्याची आतडीच बाहेर आली. तो रक्तबंबाळ होऊन पडल्याचे लक्षात येताच गोविंद टाकळी रोडने पळून गेला. पोलिसांना ही घटना कळताच ठाणेदार उल्हास भुसारी यांच्यासह पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व प्रेत उत्तरणीय तपासणीसाठी पाठविले.

विशाल होता अनाथ

मृत विशाल हा अनाथ होता. लहानपणीच त्याचे आई-वडील वारले होते. या एकाकी आयुष्यात मामाकडे राहून तो उपजीविका चालवायचा. शहरातील बारमध्ये तो काम करायचा. एकाच ठिकाणी काम न करता वारंवार बार बदलवून काम करत राहायचा, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.

गोविंदा लपून बसला होता तलावात

खून केल्यावर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला गोविंदा टाकळी रोडवरील एका तलावात दडून बसला होता. तो या रोडने पळून गेल्याचे लक्षात येताच पोलिसांनी दोन किलोमीटरच्या परिसरात शोध घेऊन तलावात दडून बसलेल्या आरोपीला पहाटे २:०० वाजता शोधून काढले आणि ताब्यात घेतले. यावेळीही तो मदयधुंद अवस्थेतच होता.

१० दिवसांतील दुसरी घटना; शहर हादरले

भंडारा शहरात गेल्या दहा दिवसांच्या कालावधीत घडलेली ही दुसरी खुनाची घटना आहे. यापूर्वी, गेल्या शनिवारी, ९ में च्या रात्री जुन्या वादातून जलाराम चौकात धारदार शस्त्राने वार करून कार्तिक भंडारी या तरुणाची हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच सोमवारी रात्री ही घटना घडली. यामुळे शहर हादरले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या