पिलांद्री आणि खांबाडी गावात खळबळ;
वनविभागाकडून पंचनामा पूर्ण, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
चित्रा न्युज प्रतिनिधी
अड्याळ: वनपरिक्षेत्र अड्याळ अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचा वावर प्रचंड वाढला असून, आज पहाटेच्या सुमारास वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये वाघ आणि बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ले चढवले. या हल्ल्यात एक म्हशीचे आणि एक गाईचे वासरू जागीच ठार झाले आहे. एकाच रात्रीत झालेल्या या दोन घटनांमुळे पिलांद्री आणि खांबाडी परिसरातील गावकऱ्यांमध्ये कमालीची धडकी भरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नियतक्षेत्र पिलांद्री अंतर्गत येत असलेल्या मौजा-पिलांद्री येथील शेतकरी श्री. गोविंदा हिरामण बावणे यांच्या घराच्या गोठ्यात नेहमीप्रमाणे गुरे बांधलेली होती. दिनांक २४ मे २०२६ रोजी पहाटे २.०० वाजताच्या सुमारास एका वन्यप्राणी वाघाने गोठ्यात घुसून तेथे बांधून असलेल्या म्हशीच्या वासराला (हल्लू) लक्ष केले.
वाघाने वासराचा गळा आवळून त्याला ठार केले आणि तिथून ओढत नेत गोठ्यापासून अंदाजे १०० मीटर अंतरावर असलेल्या तनिषच्या ढिगाऱ्याजवळ नेऊन टाकले. सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. वनविभागाला माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पाहणी केली व पंचनामा केला. ही कारवाई पिलांद्रीचे पोलीस पाटील श्री. दाजीबा चव्हाण यांच्या समक्ष, अड्याळ सहवनक्षेत्रातील वनकर्मचारी व न्यू आर.आर.टी. टीम (RRT) अड्याळ यांनी पार पाडली.
दुसरी थरारक घटना याच रात्री पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास नियतक्षेत्र केसलवाडा अंतर्गत येत असलेल्या मौजा-खांबाडी येथे घडली. येथील पशुपालक श्री. सुरेश शिवराम शाहारे यांच्या गोठ्यात बांधलेल्या गाईच्या वासराला (गोरी) वन्यप्राणी बिबट्याने आपले भक्ष्य बनवले.
बिबट्याने वासराला ठार मारून तब्बल ४०० मीटर दूर अंतरावर असलेल्या एका खाजगी शेतात नेले. विशेष म्हणजे, बिबट्याने मृत वासरू 'शेंबडीच्या' झाडावर उंचावर नेऊन खाल्ले. सकाळी ७.०० वाजताच्या सुमारास वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. झाडावर अडकलेले वासरू खाली उतरवून त्याची पाहणी करण्यात आली व रीतसर पंचनामा नोंदवण्यात आला. ही कारवाई खांबाडीचे पोलीस पाटील श्री. विजय ब्राह्मणकर यांच्या उपस्थितीत वनकर्मचारी व न्यू आर.आर.टी. टीम अड्याळ यांनी केली.
एकाच दिवशी वाघ आणि बिबट्याने पाळीव प्राण्यांना टार्गेट केल्यामुळे शेतकरी आणि गुराख्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने या हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि पीडित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी दोन्ही गावांतील नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना रात्री-अपरात्री एकटे बाहेर न पडण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


0 टिप्पण्या