वनविभागाच्या विशेष मोहिमेला यश; पवनपार तलावाजवळ गुंगीचे औषध देऊन पकडले, डीएनए तपासानंतर अंतिम खात्री
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात खळबळ उडवून देणाऱ्या घटनेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. गुंजेवाही जंगल परिसरात दोन दिवसांपूर्वी तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या चार महिलांवर हल्ला करून त्यांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीला वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
चार महिलांच्या मृत्यूनंतर वनविभागाने तातडीने विशेष मोहीम सुरू केली होती. हल्लेखोर वाघीण शोधण्यासाठी परिसरात *20 ट्रॅप कॅमेरे आणि मोशन सेन्सर सीसीटीव्ही* लावण्यात आले होते. तसेच तज्ज्ञ डॉक्टर, ट्रॅक्विलायझर टीम आणि ताडोबाच्या रॅपिड रिस्पॉन्स टीमने जंगल परिसरात सतत गस्त ठेवली होती.
अखेर ही वाघीण वनविभागाच्या पथकाला दिसून आली. त्यानंतर विशेष पथकाने नियोजनबद्ध कारवाई करत गुंगीचे औषध असलेला डार्ट मारून वाघिणीला बेशुद्ध केले. वाघीण बेशुद्ध होताच तिला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार हीच हल्लेखोर वाघीण असल्याचे सांगितले जात असले, तरी अंतिम खात्रीसाठी *डीएनए नमुने आणि कॅमेरा ट्रॅपच्या* आधारे तपास करण्यात येणार आहे.
गावकऱ्यांना दिलासा
एकाच दिवशी चार बळी गेल्याने गुंजेवाही आणि परिसरातील गावांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या कारवाईनंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
---------------------------------------------
गुंजेवाहीत 4 महिलांचा बळी घेणारी नरभक्षक वाघीण अखेर वनविभागाच्या जाळ्यात. पवनपार तलावाजवळ गुंगीचा डार्ट मारून पकडले. 20 ट्रॅप कॅमेरे, ताडोबा टीमची कारवाई. डीएनए तपासानंतर खात्री. गावकऱ्यांना दिलासा. मानव-वन्यजीव संघर्षावर पुन्हा प्रश्नचिन्ह.


0 टिप्पण्या