रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली: सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यात २५ तारखेपासून नवतपाला प्रारंभ झाला. सर्वांच्याच अंगाची लाही लाही होत असतांना साकोली तालुका मात्र वेगळ्याच प्रकरणाने तापलेला दिसून आला. खून, आत्महत्या आणि दोन अपघातांनी सध्या तरी साकोली तालुका हादरलेला दिसून येत आहे. मैत्रीचा वाद शिगेला पोहोचल्याने एकाला आपला जीव गमवावा लागला तर बेजवाबदारपणाचा कळस गाठल्याने मोटरसायकल अपघातात दोघा विद्यार्थ्यांच्या जीव गमवावा लागला. तर बेसावधपणा प्राणावर कसा उठू शकतो याचे प्रत्यंतर समोरील घटनेतून दिसून आले. मका शेतात आग लागली असतांना सभोवतालच्या आगीत सापडल्याने एकाचा होळपळून मृत्यू झाला. दुसरीकडे एका तरुणाला आयुष्यात नैराश्य आल्याने आत्महत्येचा फास गळ्याला लावला. मंगळवार ते मंगळवार हा आठवडा केवळ साकोलीसाठीच नव्हे तर साकोली तालुक्यासाठीही तापदायक तथा दुर्दैवी ठरला. पहिली घटना घडली ती मंगळवार १९ मे २०२६ रोजी. लाखांदूर रोडवरील मका शेतात आग लागली असताना सदर इसम बेसावध असल्याने यमराजाने कुठलीही संधी त्याला दिली नाही. यात त्याला होळपळून जीव गमवावा लागला. साकोली येथील शामराव गोखलू निंबेकर ( वय ६५ ) असे मृतकाचे नाव आहे. दुसरी घटना आहे याच तारखेची. वैवाहिक आयुष्यात निराशा आल्याने गावाच्या बाहेर गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. राजकुमार मोडकू ठाकरे ( वय ३८ )असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. २१ मे २०२६ रोजी दोन घटना जबरदस्त हादरविणाऱ्या ठरल्यात. पहिली घटना आहे दुचाकी अपघाताची. साकोली येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची दुचाकी लगतच्या रस्त्याच्या झाडाला आदळल्याने एकाचा जागच्या जागीच तर एकाच उपचार दरम्यान मृत्यू झाला. सदर घटना सायंकाळच्या वेळी तालुक्यातील तुमसर ते साकोली राज्य मार्गावर चांदोरी ( उसगाव ) या शिवारात घडली. कृणाल गोटेफोडे रा. सौंदड / रेल्वे, महेश कामशीलवार रा. मोरगाव/अर्जुनी अशी मृतकाची नावे आहेत. तिसरी घटना आहे खुनाच्या संबंधित. क्रिकेट खेळायला जाणाऱ्या मुलांना मृत अवस्थेत एक इसम दिसून आला. पोलिसांना पाचारण करण्यात आले. चौकशी अंती हा खून असल्याचे निष्पन्न झाले. खून झालेला इसम हा मूरपार / लेंडेझरी ता. सडक अर्जुनी येथील आहे. निखिल राजकुमार कांबळे ( वय ३० )असे खून झालेल्या इसमाचे नाव असून तो काही दिवसापासून सकोलीत वास्तव्यास होता. साकोली पोलिसानी तपासाची यंत्रणा गतिमान करून अवघ्या १२ तासात गणेश मनोहर वलथरे, कमलेश चुनीलाल कुकवास, सागर शंकर पारधी, ओमकार सुनील मेश्राम आणि एका विधी संघर्ष बालकाला खुनाच्या संदर्भात अटक केली. विशेष म्हणजे या प्रकरणात खुनाकरिता वापरण्यात आलेला चाकू पोलीस विभागाने तलावातून शोधून काढला.


0 टिप्पण्या