गटनेते संदीप बावणकुळे यांची प्रशासनाकडे मागणी
चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:साकोली-सेंदुरवाफा नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ५ मधील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी येथील पाझर बोड्या (तलाव) आणि खुली जागा तातडीने नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्यात यावी अशी आग्रही मागणी गटनेते तथा नगरसेवक इंजि. संदीप वासुदेव बावणकुळे यांनी प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हा परिषद भंडारा येथील जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एन. चाचेरे यांना अधिकृत निवेदन देऊन तात्काळ कारवाई करण्याची विनंती केली. या निवेदनाची गंभीर दखल घेत कार्यकारी अभियंता चाचेरे यांनी उपविभागीय अभियंता सुशांत गडकरी यांना यासंबंधीचा तपासणी अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रभाग क्रमांक ५ मधील महत्त्वाच्या बोड्या व मोकळ्या जागा सध्या जलसंधारण/पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील जागांचा समावेश असून, तिथे भव्य विकासकामे नियोजित आहेत.गट क्र. ३०५:०.४९ हे. आर जागा (बाल उद्यानासाठी नियोजित).गट क्र. ४०३: १.०८ हे.आर जागा क्रीडा संकुलासाठी नियोजित) गट क्र. ४४२:०.३८ हे.आर जागा (तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरणासाठी नियोजित) सध्या ही जागा दुसऱ्या विभागाच्या ताब्यात असल्याने नगरपरिषदेला या भागात रस्ते, नाली, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत नागरी सुविधा विकसित करताना मोठ्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, निधी उपलब्ध असूनही कायदेशीर तांत्रिक बाबींमुळे स्थानिक नागरिकांना आवश्यक त्या सुविधा मिळण्यास विलंब होत आहे. नगरसेवक संदीप बावणकुळे यांनी निवेदनासोबत जोडलेल्या अधिकृत शासकीय 'गाव नमुना सात' (७/१२ उतारा) नुसार, मौजा सेंदुरवाफा (ता. साकोली) येथील संबंधित सर्व गटातील जमीन ही पूर्णपणे शासकीय मालकीची असून, त्यावर 'बोडी' अशी स्पष्ट नोंद आहे. त्यामुळे ही जागा नगरपरिषदेकडे वर्ग करण्यात कोणतीही कायदेशीर अडचण नाही.
_______________________________________________
प्रभाग क्रमांक ५ चा सर्वांगीण विकास करण्यासाठी या जागा नगरपरिषद साकोली यांच्या ताब्यात येणे अत्यंत गरजेचे आहे. या शासकीय जागा नगरपरिषदेकडे हस्तांतरित झाल्यास, तिथे क्रीडा संकुल, बाल उद्यान आणि तलावाचे सौंदर्यीकरण यांसारखे मोठे प्रकल्प तातडीने सुरू करता येतील. यामुळे या भागाचा नियोजनबद्ध व वेगवान विकास होईल आणि स्थानिक नागरिकांच्या मूलभूत समस्या कायमच्या सुटतील.
इंजि. संदीप बावणकुळे.
गटनेते तथा नगरसेवक, साकोली-सेंदुरवाफा नगरपरिषद।


0 टिप्पण्या