Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांगांच्या 55 प्रमुख मागण्यांसाठी 17 जूनला निवेदन व जनआंदोलनात सहभागी व्हावे..


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :-हॉटेल साई प्लाझा, भंंडारा येथे आज दिव्यांग जनसंवाद फाउंडेशन, भाजपा दिव्यांग विकास आघाडी महाराष्ट्र राज्य व विविध दिव्यांग संघटनांच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी 17 जून 2026 रोजी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

या निवेदनामध्ये दिव्यांग नागरिकांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य, रोजगार, स्वावलंबन, आरक्षण, सुलभता व सन्मानपूर्वक जीवनाशी संबंधित 55 प्रमुख मागण्या शासनासमोर मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये दिव्यांग पेन्शन किमान ₹6000 प्रतिमाह करणे, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार निर्मिती, ई-रिक्शा व स्कुटी वितरण, आरोग्य विमा, शासकीय व खासगी क्षेत्रात 6% आरक्षण, दिव्यांगांसाठी स्वतंत्र विकास महामंडळ, घरपोच वैद्यकीय सेवा, सुलभ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क माफीसह अनेक महत्त्वपूर्ण मागण्यांचा समावेश आहे.
दिव्यांग नागरिकांच्या समस्या व मागण्या शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील दिव्यांग बांधवांनी 17 जून 2026 रोजी स्थानिक प्रशासनास निवेदन सादर करून या जनआंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

या पत्रकार परिषदेस सरिता रंगारी, संजय केवट, मेघा वालके, पुष्पेंद्र कश्यप, रोशन वंजारी, विनोदभाऊ गिरडकर, ललिता गोटमारे, अपर्णा देशपांडे, पूर्वी चौरसिया तसेच नागपूर जिल्ह्यातील विविध दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाने दिव्यांगांच्या सर्व मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय घेऊन राज्यातील लाखो दिव्यांग नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या