Ticker

6/recent/ticker-posts

मुरमाडी /तुप परिसरात अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ७.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा : भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा येथील उपविभाग साकोली पथकाने अवैध रेती वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत ७ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी १०जून ते ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत नदी पात्रातून रेती उपसा बंद करण्यात यावा. असे आदेश दिले असले तरी यास न जुमानता रेती  तस्करा कडून  रात्रीचे सुमारास भूगाव रेती घाटातून  रेती उपसा व वाहतूक सुरू आहे. या प्रकाराने जिल्हाधिकारी यांचे आदेशाची अवहेलना होत आहे.

 पोलीस स्टेशन पालांदुर हद्दीतील मौजा कान्हळगाव शेतशिवार परिसरात अवैध रेती वाहतुकीची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार दि. १६ जून २०२६ रोजी साकोली पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला असता, निळ्या रंगाचा SWARAJ 843 XM कंपनीचा विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर व त्यास जोडलेली लाल रंगाची विनाक्रमांकाची ट्रॉली यामधून विनापरवाना एक ब्रास रेतीची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले.

या प्रकरणी ट्रॅक्टर चालक प्रकाश श्रावण रामटेके (वय ३६, रा. मुरमाडी (तुप.), ता. लाखनी, जि. भंडारा) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान तो हा ट्रॅक्टर मालक राजू तुकाराम शेंडे (वय ४५, रा. शिवणी (मोगरा), ता. लाखनी, जि. भंडारा) यांच्या सांगण्यावरून रेतीची वाहतूक करीत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीसांनी घटनास्थळावरून १ ब्रास रेती (किंमत ६,००० रुपये) तसेच ट्रॅक्टर व ट्रॉली (किंमत ७,००,००० रुपये) असा एकूण ७,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन पालांदुर येथे गुन्हा क्रमांक १६३/२०२६ अन्वये कलम ३०५(ई), ४९ भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधातील या कारवाईमुळे रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली असून जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनिल ठवकर व त्यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, पुढील तपास पांलादुर पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या