Ticker

6/recent/ticker-posts

रजिस्ट्रीला 'ठराविक रेट'! दुय्यम निबंधक ACB च्या जाळ्यात

चंद्रपूरच्या मोहन शेटट्टीवारांना 4 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; डेटा ऑपरेटरमार्फत चालायचा 'धंदा'


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : "रजिस्ट्रीसाठी ठराविक रेट" या धक्कादायक प्रकारामुळे चंद्रपूरचे दुय्यम निबंधक कार्यालय लाचखोरीच्या विळख्यात असल्याचे उघड झाले आहे. दुय्यम निबंधक मोहन चंद्रकांत शेटट्टीवार यांना  4 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB)रंगेहाथ पकडले आहे.

तक्रारदाराच्या पक्षकारांच्या दोन मालमत्ता नोंदणीसाठी प्रत्येकी 2 हजार रुपये, अशा एकूण 4 हजार रुपयांची मागणी शेटट्टीवार यांनी केली होती. विशेष म्हणजे ही रक्कम थेट न घेता त्यांच्या डेटा ऑपरेटरमार्फत स्वीकारली जात होती. 

तक्रारदाराने ACB कडे धाव घेतली. पंचासमक्ष पडताळणी करून सापळा रचला असता, आरोपीने मागितलेली लाच ऑपरेटरमार्फत स्वीकारल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ACB पथकाने तात्काळ कारवाई करत शेटट्टीवार यांना जाळ्यात ओढले.

या घटनेमुळे नोंदणी कार्यालयातील व्यवहारांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 'प्रत्येक रजिस्ट्रेशनला ठराविक रक्कम' घेतली जात होती का? कार्यालयात लाचखोरीची साखळी कार्यरत आहे का? यामागे मोठे रॅकेट आहे का? याचीही सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, पोलीस निरीक्षक सचिन धर्मेजवार आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.

दरम्यान, ACB ने नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा.

__________________________________

रजिस्ट्रीचा 'रेट' फिक्स! निबंधक ACB च्या जाळ्यात

चंद्रपूरच्या दुय्यम निबंधक मोहन शेटट्टीवारांना 4 हजारांची लाच घेताना अटक. दोन मालमत्ता नोंदणीसाठी प्रत्येकी 2 हजार मागितले. डेटा ऑपरेटरमार्फत पैसे घेत होते. 'प्रत्येक रजिस्ट्रीला ठराविक रेट' होता का? मोठ्या रॅकेटचा संशय. ACB कडून खोलवर तपास सुरू. लाच मागितल्यास 1064 वर कॉल करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या