Ticker

6/recent/ticker-posts

३ लक्ष ५० हजार रोपांचे शिवनीबांध रोपवाटिकेचे निर्धारित लक्ष्य


रवि भोंगाने चित्रा न्युज 
 साकोली:- साकोली वरून अवघ्या १२ कि. मी. अंतरावर असलेली शिवनीबांध रोपवाटिका. तालुक्यातील सर्वाधिक जुनी रोपवाटिका. सामाजिक वनीकरण विभाग भंडारा अंतर्गत परिक्षेत्र साकोली मध्यवर्ती रोपवाटिका शिवनीबांध रोपवाटिकेचे नाव सर्वदूर घेतले जाते. सध्याच्या घटकेला ३ लक्ष ५० हजार विविध प्रजातीच्या रोपांचे निर्धारित लक्ष्य आहे. परंतु लागवडीसाठी इतकी मोठे रोपे तयार करायला आणखी काही महिन्यांचा अवधी लागणार आहे. येत्या पावसाळ्यात वृक्षरोपणासाठी ही रोपवाटिका सज्ज होत आहे. आताच्या घटकेला ही रोपवाटिका हिरवा शालू घालून सज्ज आहे. सविस्तर वृत्त असे की, साकोली ते लाखांदूर राज्य मार्गावर अवघ्या साकोली पासून १२ कि.मी. अंतरावर असलेली ही निसर्गरम्य रोपवाटिका. तसा हा परिसर सदोदीत हिरवागार असतो. शिवनीबांध जलाशय, रस्त्याच्या दुतर्फा हिरवीकंच झाडे, लागूनच असलेली रोपवाटिका ही तिन्ही ठिकाणे प्रवाशासाठी आणि पर्यटकांसाठी आवडीची आहेत. या परिसरात प्रवासी, पर्यटक एकदा का आला की त्याला या परिसरात थांबण्याचा मोह आवरता येत नाही. अशावेळी राज्य मार्गावरील हिरवीगार असलेली रोपवाटिका क्षणभरासाठी का होईना पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असतेच असते. त्यामुळे या रोपवाटिकेला जाण्याचा मोह भल्याभल्यांना टाळता येत नाही. या रोपवाटिकेला शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी निसर्ग सहल म्हणून दरवर्षी मोठ्या संख्येने भेट देत असतात. या रोपवाटिकेचे वैशिष्ट्य असे की सदर रोपवाटिकेतील रोपे दरवर्षी दूरपर्यंत वृक्षारोपणासाठी घेऊन जातात तर शेतकरी लागवडीसाठी. विविध प्रकारच्या प्रजातीची रोपे असल्याने शेतकरीसुद्धा या रोपवाटिकेला महत्त्व देत असतात. आजच्या घटकेला या रोपवाटिकेत ( नर्सरी ) संभाव्य ३ लक्ष ५० हजार विविध प्रजातीचे निर्धारित लक्ष्य आहे. ज्यात बांबू, शिसम, सिंगापुरी कापूस, सागवान, सिताफळ, बिबा, आवळा, बेहडा, करंजी, वड, पिंपळ, आंबा, कडुलिंब, हिरडा, गुलमोहर, अर्जुन, हत्तीफळ, बेलपत्री, चिंच, कदम, जांभूळ, शमीपत्र, शिवण, अंमलतास ( बाहवा ) यासारख्या विविध प्रजातीची असंख्य रोपे या रोपवाटिकेत आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे, वनपाल कल्याणी खोब्रागडे आणि वनरक्षक संगीता खरवडे यांच्या मार्गदर्शनात सदर रोपवाटिकेचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. वनमजूर चंद्रभान शहारे यांचे या रोपवाटिकेवर २४ तास बारकाईने लक्ष असते. रोपवाटिकेची दैनंदिन देखभाल करणे, रोपवाटिकेला पाणी देणे, नवीन रोपे तयार करणे यासारखे अनेक कामे येथील मजूर सातत्याने लक्ष देऊन बारकाईने, लक्षपूर्वक आणि जबाबदारीने करीत असतात. आगामी काळात पावसाळा लागणार आहे. पावसाळ्यात वृक्षारोपणाचे सत्र सुरू होत असते. शाळा, महाविद्यालयाबरोबरच शासकीय, निम शासकीय कार्यालय येथे वृक्ष वृक्षारोपण कार्यक्रमाचा धडाका सुरू असतो. त्यामुळे या रोपवाटिकेला आगळे वेगळे महत्त्व प्राप्त होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या