चित्रा न्युज प्रतिनिधी
वर्धा:- शहरामध्ये मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या गंभीर समस्येबाबत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) तर्फे नगर परिषद प्रशासनाला अनेक वेळा निवेदने देण्यात आली होती. मात्र, संबंधित विभागाकडून या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत होते.
याच पार्श्वभूमीवर दिनांक १५ जून २०२६ रोजी AIMIM तर्फे वर्धा नगर परिषदेला निवेदन देऊन, तात्काळ कारवाई न झाल्यास नगर परिषद कार्यालयात कुत्रे सोडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता.
AIMIM च्या या आंदोलनाच्या इशाऱ्याची गंभीर दखल घेत नगर परिषद प्रशासनाने अखेर शहरातील मोकाट कुत्रे पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे वर्धा शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी AIMIM तसेच नगर परिषद प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
AIMIM ने भविष्यातही नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, शहरातील जनतेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रश्नांवर पक्ष नेहमीच जनतेच्या पाठीशी राहील, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.


0 टिप्पण्या