Ticker

6/recent/ticker-posts

अल्पवयीन शाळकरी मुलीने वासनांधांचा नकार दिल्याने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न

व्हिडिओ व्हायरल केल्याने खळबळ!

भंडारा जिल्हयात संतापजनक प्रकार!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
तुमसर:एका १५ वर्षांच्या अल्पवयीन शाळकरी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करण्यात आला. एवढ्यावरच विकृतांचे मन भरले नाही, तर त्या व्हिडिओच्या बळावर तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आली. मुलीने या नराधमांना कडाडून विरोध करताच, त्यांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी केली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा सुन्न झाला असून गोबरवाही पोलिसांनी ५ आरोर्पीविरुद्ध पोक्सो आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 प्राप्त माहितीनुसार, गोबरवाही पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावात एका १५ वर्षीय पीडित मुलीला आरोपी भावेश यादव (१९ वर्षे, रा. सिंडीकेट कम्प, डोंगरी माईन्स) याने ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही प्रेमाचे आमिष दाखवले. २४ एप्रिल २०२६ च्या मध्यरात्री भावेश हा पीडितेच्या घरी गेला. ते दोघे बेडरूममध्ये असतानाच, आधीच दबा धरून बसलेले त्याचे मित्र क्षितिज पटले (१९ वर्षे, रा. डोंगरी बुज), बाल्या उर्फ करण चौधरी (२१ वर्षे) आणि त्यांच्यासोबत असलेले इतर दोन अल्पवयीन मुले अचानक बेडरूममध्ये शिरली. यावेळी क्षितिज पटले याने त्याच्या मोबाईलमध्ये त्या दोघांचा व्हिडिओ शूट केला.

*नकार दिला म्हणून व्हिडिओ केला वायरल*
व्हिडिओ काढल्यानंतर आरोपीने पीडित मुलीला गाठून, तो व्हिडिओ दाखवित धमकाविले. मुलीकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र, पीडितेने धैर्य दाखवत त्यांच्या या मागणीला स्पष्ट नकार दिला. इच्छा पूर्ण होत नसल्याचे पाहून संतापलेल्या या नराधमांनी तो आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
व्हिडिओ व्हायरल झाल्याचे समजताच पीडितेच्या पायाखालची जमीनच सरकली. अखेर तिने धैर्याने गोबरवाही पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गोबरवाहीचे ठाणेदार शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनात त्या पाचही नराधमांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले आहे. यामध्ये तीन सज्ञान आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या