Ticker

6/recent/ticker-posts

फार्मसिस्ट नसलेली दुकाने सील करण्याचे आयुक्तांचे आदेश


मेडिकल दुकानदाराचे  धाबे दणाणले

रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी 

 साकोली:- नव्यानेच रुजू झालेले अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा मोठा धडाका सुरू केला असून राज्यात अनेक ठिकाणी त्यांनी भेसळयुक्त पदार्थांवर धाडी टाकून राज्यभरात मोठी कारवाई केली. आता फार्मसिस्ट नसलेली मेडीकल दुकाने सील करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. परिणामी मेडिकल दुकानदारांमध्ये खडबड उडालेली आहे. सविस्तर वृत्त असे की, आयएएस असलेले तुकाराम मुंढे यांनी काही दिवसापूर्वी अन्न व औषध प्रशासन आयुक्ताचा पदभार सांभाळला. आपला पदभार स्वीकाराल्यानंतर त्यांनी राज्यभरात भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्यावर त्यांनी मोठी कारवाई केली जी सातत्याने सुरूच आहे. प्रसिद्धी माध्यमातून धाडी टाकून कारवाई करीत असल्याच्या  बातम्या रोज येत असल्याने भेसळ करून माल विकणाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. आता त्यांनी मानवी आरोग्याच्या अत्यंत निगडित  असलेल्या मेडिकल ( औषधालय ) दुकानदाराकडे त्यांनी आपला मोर्चा वळविला. फार्मसिस्ट नसलेली मेडिकल दुकाने सील करण्याचे फर्मान सोडले असून तसे आदेश त्यांनी आपल्या शिलेदारांना दिलेले आहेत. मेडिकल दुकानाचा परवाना मिळविण्यासाठी डी. फार्म किंवा बी. फॉर्म असा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. डी. फार्म हा डिप्लोमा २ वर्षाचा कोर्स असून एम. एस. बी. टी. अंतर्गत येतो. तर बी. फार्म हा ४ वर्षीय अभ्यासक्रम असून विद्यापीठांतर्गत येतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मेडिकल परवाना ( लायसन्स) मिळण्यास मदत होते. त्यानंतर मेडिकलची दुकाने थाटता येतात. मात्र बऱ्याच ठिकाणी डी. फार्म किंवा बी. फार्म झालेल्यांचा मेडिकल परवाना ( लायसन्स ) भाडे तत्त्वावर घेऊन दुकान थाटले जातात. इतकेच नव्हे तर नियमानुसार मेडिकल दुकानांमध्ये फार्मसिस्ट दुकानाच्या वेळात असणे नियमानुसार बंधनकारक असते. या दोन्ही नियमांना बगल देऊन महाराष्ट्र राज्यात मेडिकल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे आयुक्तांच्या लक्षात आले. मेडिकल परवाना धारकाला मोजके मासिक भाडे देऊन स्वतः मात्र हजारो रुपयाची कमाई केली जात आहे. ही बाब आयुक्त यांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या शिलेदारांना अशा दुकानदारांवर सक्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले असून  त्यामुळे भेसळयुक्त पदार्थ खपवणाऱ्या बरोबरच आता मेडिकल दुकानदारांचे धाबे दणाणले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या