Ticker

6/recent/ticker-posts

महागाईच्या आगीत होरपळलेल्या जनतेसाठी 'लाल बावटा' रस्त्यावर!


CPI चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा; पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढीविरोधात एल्गार


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर: केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल, गॅस, डाळी, खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले असून सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. याविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे तीव्र एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यव्यापी आंदोलनाचा हा भाग होता.

या आंदोलनाचे नेतृत्व CPI चे जिल्हा सचिव कॉ. रवींद्र उमाटे व माजी नगरसेवक, जिल्हा सहसचिव कॉ. राजू गैनवार यांनी केले. उपजिल्हाधिकारी दगडू कुंभारे यांना निवेदन देऊन आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवला.

"वाढत्या महागाईमुळे शेतकरी, कामगार, युवक, महिला, वाहनधारक या सर्वांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. पेट्रोल-डिझेल-गॅसच्या दरवाढीने प्रत्येक घराचे बजेट कोलमडले. सरकार मात्र मूग गिळून गप्प आहे," असा घणाघात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

1.पेट्रोल-डिझेल-गॅस-खाद्यतेल-डाळी यांचे भाव तातडीने कमी करा. 2. शेतमालाला हमीभाव द्या; खते-बियाणे अनुदानासह अल्प दरात द्या. 3. बियाणांची साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. 4. शालेय पोषण आहार, आशा व गटप्रवर्तकांना 30 हजार रुपये किमान वेतन द्या. 5. सर्वांना पेन्शन लागू करा. 6. NEET पेपरफुटी करणाऱ्यांना तुरुंगात टाका. 7. शिक्षणाचा बाजार थांबवा.8. बेरोजगारांच्या हाताला काम द्या 9. रब्बी हंगाम धान खरेदीतील मनमानी बंद करा.10. शेतकरी मित्रांना शासकीय सेवेत सामावून घ्या. अशा दहा ज्वलंत प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहे. या निवेदनाच्या प्रती राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री यांनाही पाठवण्यात आल्या.

यावेळी कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. वंदना गैनवार, कॉ. किशोर निब्रड, कॉ. राजू नगरकर, कॉ. मल्लेश कमटम व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------------------------------
महागाईविरोधात CPI रस्त्यावर!

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढीने जनता त्रस्त. रवींद्र उमाटे-राजू गैनवार यांच्या नेतृत्वात धरणे. मागण्या: भाव कमी करा, आशा वर्करला 30 हजार पगार द्या, NEET पेपरफुटीवर कारवाई करा. 'जनविरोधी सरकारचा धिक्कार असो' च्या घोषणा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या