'इंटक'तर्फे चौकशी व कठोर कारवाईची मागणी
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : एमआयडीसी परिसरातील मजूर पुरवठा कंत्राटदारांकडून मोठ्या प्रमाणावर कामगार कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले असून, या प्रकरणी तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) चंद्रपूर जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात इंटकचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी कामगार विभाग आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना एक सविस्तर निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, एमआयडीसी परिसरातील अनेक मजूर पुरवठा कंत्राटदारांकडे मर्यादित संख्येच्या कामगारांचा परवाना असतानाही, प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त कामगारांकडून काम करून घेतले जात आहे. उदाहरणार्थ, ५० कामगारांचा परवाना असताना १०० किंवा त्याहून अधिक कामगार कामावर ठेवले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. हा प्रकार नियमांचे थेट उल्लंघन करणारा आहे.
याशिवाय, अनेक ठिकाणी कामगारांचे ईपीएफ (EPF), ईएसआय (ESI), विमा व इतर कायदेशीर लाभ नियमितपणे जमा केले जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. परिणामी, एखाद्या कामगाराचा अपघात, दुखापत किंवा मृत्यू झाल्यास त्यांना कायदेशीर नुकसानभरपाई आणि विमा लाभ मिळण्यात प्रचंड अडचणी निर्माण होत आहेत. काही प्रकरणांमध्ये तर कंत्राटदारांकडून अपघातानंतर कामगारांना अत्यंत अल्प रक्कम देऊन परस्पर तडजोड (सेटलमेंट) करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
ही बाब कामगारांच्या सुरक्षिततेच्या आणि श्रमिक हक्कांच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व मजूर पुरवठा कंत्राटदारांची सखोल चौकशी करावी, परवान्यातील मजूर संख्या व प्रत्यक्ष कामगारांची पडताळणी करावी, तसेच सर्व कायदेशीर कपाती नियमित जमा होतात की नाही याची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कामगारांचे शोषण थांबवून त्यांना कायदेशीर न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आहे


0 टिप्पण्या