Ticker

6/recent/ticker-posts

बाप रे बाप ! तालुक्यातील ७ शाळा शिक्षिकाविना

रवि भोंगाने चित्रा न्युज 
साकोली:- आतापर्यंत आपण विना भिंतीच्या शाळेविषयी ऐकले आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून बघितलेही. गावातील झाडाखाली किंवा गावातील एखाद्या चांगल्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकविताना आपण शिक्षकांना बघितले आहे. प्रिंट मीडियाच्या माध्यमातून ते वाचण्यात आलेही आहे. किमान येथे शिक्षक तरी होते. परंतु शाळा, शाळेची इमारत आणि विद्यार्थी असूनही शिक्षकांची नियुक्तीच नाही. बाप रे बाप ! चक्क साकोली तालुक्यातील ७ शाळा शिक्षिकाविना. साकोली तालुक्यात ऐकावे ते नवलच. तसंही साकोली तालुका हा नवलाईचाच राहिलेला आहे. या तालुक्यात केव्हा ? कुठे ? नवल घडेल हे सांगता येत नाही. नवलाईची अनेक उदाहरणं मागे पुढे कधी सांगता येईल पण सध्या ही नवलाईची बातमी बघू या. हो ! हे खरे आहे. साकोली तालुक्यातील ७ शाळांमध्ये चक्क शिक्षकांची नियुक्तीच नाही. या निमित्ताने ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षण आणि पुढील भविष्य अत्यंत विदारक असल्याचे चित्र स्पष्ट आणि पारदर्शक होत आहे. त्यामुळे विद्यमान सरकारचे शाळा विषयीचे धोरण आणि  विद्यार्थ्यांच्या भविष्याविषयी काय मानसिकता आहे याचे अवलोकन प्रत्येक नागरिकांना आणि पालकांना यापुढे करावे लागणार आहे. शिक्षक नसल्याने या शाळा बंद होणार काय ? आणि झाले तर त्या गावातील पालकांनी काय करावे असा गंभीर प्रश्न या निमित्याने समोर आलेला आहे. यापूर्वीच साकोली तालुक्यात ४१ एक शिक्षकी आणि २१ दोन शिक्षकी शाळा असल्याची वृत्त प्रसिद्ध माध्यमात आले. त्यात आता तालुक्यात ७ शाळेतच शिक्षक नसल्याची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. शाळा आहे, शाळेची इमारत आहे, विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकवायला पालक तयार आहे मात्र चक्क या शाळेत शिक्षकांची नियुक्तीच नाही. १ ते ४ वर्ग असलेल्या या सात शाळेत ८ ते १५ दिवसातून दुसऱ्या शाळेतील शिक्षक येतात आणि शिकवितात. शिकवितात म्हणण्यापेक्षा अभ्यासाव्यतिरिक्त शासनाची इतर कामे पार पाडतात. त्यामुळे या ७ शाळेतील गावकऱ्यांनी करावे काय ? साकोली तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती आहेत. विशेष म्हणजे आमदार नाना पटोले यांचा तालुका आहे. असे असतांना ७ शाळेत शिक्षकांची नियुक्तीच नाही. ही बाब आता गंभीरूपात समोर आलेली आहे. शाळेचे सत्र सुरू होईपर्यंत शिक्षकांची नियुक्ती करावी या मागणीला आता पालकांनी धारेवर धरले आहे. ही पालकांची आता आग्रही मागणी आहे. १ जुलैपासून शाळा सुरू होत आहेत. म्हणजे शाळेचे पुढचे सत्र सुरू व्हायला आणखी १० दिवस बाकी आहेत. कटगधरा, सीरेगाव टोला, निलज, पापडा, सराटी, पुजारीटोला आणि किटाळी अशी ७ गावे आहेत.  ज्या गावातील शाळेत शिक्षकांची नियुक्तीच नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या