रवींद्र बावणे यांनी धाडसाने झुंज देत वाचवला जीव; परिसरात भीतीचे सावट
राजेश येसेकर चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : भद्रावती शहर व परिसरात गेल्या 2-3 दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. अखेर आज एका शेतकऱ्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने जखमी शेतकऱ्याने प्रसंगावधान राखत बिबट्याशी झुंज दिल्याने मोठी जीवितहानी टळली.
यापूर्वी गौतम नगर व जिल्हा परिषद शाळेच्या मागील परिसरात बिबट्याने एका वासरासह एका वराहाची शिकार केली होती. घटनास्थळी बिबट्याचे पगमार्क व पंजांचे ठसे आढळून आले होते. त्यानंतर स्थानिक नगरसेवक व नागरिकांनी वन विभागाकडे तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती. मात्र वन विभागाने आवश्यक ती ठोस कारवाई न केल्याची नाराजी नागरिकांत आहे.
आज सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास गौराळा रेल्वे स्टेशनजवळील शेतात काम करत असताना रवींद्र किसन बावणे यांच्यावर बिबट्याने अचानक झडप घातली. या हल्ल्यात बावणे यांच्या पोटाला व हाताला गंभीर दुखापत झाली. मात्र त्यांनी धाडसाने प्रतिकार करत बिबट्याशी झुंज दिली आणि स्वतःचा जीव वाचवला.
हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतच रवींद्र बावणे यांनी भद्रावती वन विभागाच्या कार्यालयात जाऊन घटनेची माहिती दिली. त्यानंतर ते स्वतःच ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे उपचारासाठी दाखल झाले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेनंतर भद्रावती शहरासह आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. नागरिकांना सकाळी व सायंकाळी शेतात किंवा निर्जन भागात जाताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच वन विभागाने विलंब न लावता पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
_______________________________________
🐆 _ब्रेकिंग: भद्रावतीत बिबट्याचा हल्ला!
*गौराळा स्टेशनजवळ शेतात काम करणाऱ्या रवींद्र बावणे यांच्यावर बिबट्याची झडप. पोट-हाताला गंभीर जखमा, पण धाडसाने झुंज देऊन जीव वाचवला. गेल्या 3 दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार, वासरू-वराह शिकार. नागरिक संतप्त - 'वन विभागाने तातडीने पिंजरा लावा'. सकाळ-संध्याकाळ शेतात जाणाऱ्यांनी काळजी घ्या.


0 टिप्पण्या