चित्रा न्युज ब्युरो
मुंबई: शिवसेना ठाकरे गटातून फुटून आठवड्याभरापूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या सहा खासदारांपैकी एक, खा. संजय दिना पाटील यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना अत्यंत अर्वाच्च भाषा वापरत पत्रकारांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारितेवर लोकप्रतिनिधीनेच अशा प्रकारे जाहीर हल्ला चढवल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीकेची झोड उमटली आहे. तसेच नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत संजय दिना पाटील प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. बराच वेळ संवाद झाल्यानंतर ते तिथून निघत असताना एका माध्यम प्रतिनिधीने त्यांना 'राजूल पाटील नक्की कुठे आहेत?' या संदर्भात प्रश्न विचारला. या साध्या प्रश्नावरच खासदार पाटील यांचा पारा चढला आणि त्यांनी थेट पत्रकारांवर अरेरावी करण्यास सुरुवात केली.
संजय दिना पाटील हे पत्रकारांना दमदाटी करत म्हटले, "माझं हे बघू नका तुम्ही, अती करताय. ए भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर नाहीतर मी विसरून जाईन की मी खासदार आहे तर तुम्ही काय आहे ते..." यावेळी उपस्थित पत्रकारांनी शांततेची भूमिका घेत "हो, आम्ही निघतोय" असे सांगितले, तरीही खासदारांची मग्रुरी कमी झाली नाही.
पत्रकार शांत असतानाही खा. संजय दिना पाटील यांनी पत्रकारांसमोर जाहीरपणे अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ सुरू केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी थेट मारहाण करण्याची धमकी दिली. ते म्हणाले:
"मी इज्जत करतो, इज्जत करा सांगतोय परत XXXXXXXX असं. उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उभं करतोय तुम्हाला, जेवायला देतोय. काय, उगाच त्यांच्याकडे जाल. परत आला ना तर मारून पाठवणार तुम्हाला. जे बोलायचं, जे लिहायचं ते लिहा."
त्यांच्या या धमकीवर पत्रकारांनी आक्षेप घेतला असता, त्यांनी अधिकच मग्रुरी दाखवत पोलिसांकडे जाण्याचे आव्हान दिले. "लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे... कमिशनरकडे जाऊन कम्प्लेंट करा. खूप दिवस सहन केलं. मग अजून कशाला XXX घुसताय... अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची.. बोललीय ना ती.. सागितलं ना सर्व... त्याने काही बोलू दे.. अरे काही बोलू दे.. तुझ्या XXXXX XXXX गेलं असं म्हणत. तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार," अशा शब्दांत त्यांनी उपस्थित माध्यम प्रतिनिधींना धमकावले.
"सत्ताधारी पक्षात गेल्यावर गुंडगिरीची मुभा मिळते का?" – जनतेचा संतप्त सवाल
ठाकरे गटातून शिंदे गटात गेल्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच खासदारांनी दाखवलेल्या या 'माजा'मुळे राजकीय वर्तुळात आणि सामाजिक माध्यमांवर तीव्र पडसाद उमटत आहेत. सत्ताधारी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळेच या खासदारांना कायद्याची भीती उरलेली नाही का? सत्ता बदलताच पत्रकारांवर अशी गुंडगिरी करण्याची मुभा मिळते का? असे संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.


0 टिप्पण्या