Ticker

6/recent/ticker-posts

लेंडाळा तलावातील मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या;

नगरसेविका सरिता सुर यांची मागणी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : लेंडाळा तलावाच्या सौंदर्यीकरण व खोलीकरणाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडून मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करत नुकसानग्रस्त मच्छीमारांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी नगरसेविका सौ. सरिता रामदास सुर यांनी केली आहे.

याबाबत नगर परिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, लेंडाळा तलावात अनेक मच्छीमार कुटुंबांचा मत्स्य व्यवसाय सुरू असून त्यांच्या उदरनिर्वाहाचे ते प्रमुख साधन आहे. मात्र तलावाचे सौंदर्यीकरण व खोलीकरणाचे काम सुरू असताना संबंधित मच्छीमारांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. कामादरम्यान तलावातील पाण्याची पातळी कमी झाल्याने आणि अन्य कारणांमुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडल्याचा फटका मच्छीमारांना बसला आहे.

या घटनेमुळे तलावावर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांच्या उत्पन्नाचा स्रोत बंद पडला असून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसानाचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे आणि मच्छीमारांना योग्य ती आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नगरसेविका सरिता सुर यांनी केली आहे.

प्रशासनाने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन मच्छीमारांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही स्थानिक स्तरावर दिला जात आहे.निवेदन देतांना माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक ॲड.सुनील नामोजवार,नगरसेवक अनिल पडोळे,नगरसेवक प्रथम गेडाम व नगरसेवक पल्लवी तामगाडगे हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या