⭕ पहिल्याच दिवशी ९२.५३% बालकांना लस!
⭕ लसीकरणाचे उद्दीष्ट पुर्ण झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी दिली माहिती.
चित्रा न्युज प्रतिनिधी
गडचिरोली:-जिल्ह्यात आज राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय 'पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला' नागरिकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील तब्बल ७७६६६ चिमुकल्यांना पोलिओचा डोस पाजण्यात आला असून, जिल्ह्याचे ९२.५३% लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
*पल्स पोलिओ मोहीम: एका दृष्टिक्षेपात आकडेवारी*
एकूण अपेक्षित लाभार्थी (उद्दिष्ट): ८२,९८४ बालके
७६,७८९ बालके(० ते ५ वयोगटातील ),५ वर्षावरील- ८७७ असे एकूण- ७७६६६ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.
एकूण पूर्ण झालेले काम: ९२.५३%
सुटलेल्या बालकांसाठी घरोघरी मोहीम (IPPI) जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. माधव शिंदे यांनी माहिती देताना सांगितले की, बूथवरील मोहिमेच्या दिवशी जे लाभार्थी कोणत्याही कारणास्तव पोलिओ डोस घेण्यापासून वंचित राहिले आहेत, त्यांच्यासाठी आता 'आयपीपीआय' (IPPI) टीममार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे.
सुटलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना डोस देण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून त्याची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे:
शहरी भागात: सलग ५ दिवस घरोघरी सर्वेक्षण
ग्रामीण भागात: सलग ३ दिवस घरोघरी सर्वेक्षण
आरोग्य विभागाच्या टीम घरोघरी जाऊन 'एकही मूल सुटता कामा नये' या उद्देशाने लसीकरण पूर्ण करतील.
लसीकरणासोबतच 'ताप रुग्ण सर्वेक्षण'
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी या मोहिमे बाबत अधिक माहिती देताना स्पष्ट केले की, घरोघरी जाणाऱ्या या पथकांमार्फत केवळ पोलिओ लसीकरणच केले जाणार नाही, तर या सर्वेक्षणादरम्यान 'ताप रुग्ण सर्वेक्षण' देखील केले जाणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने सर्व पालकांना आणि नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, पोलिओ लसीकरण आणि ताप सर्वेक्षणासाठी घरोघरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे. आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकाला पोलिओचा डोस नक्की पाजा आणि देशाच्या पोलिओमुक्तीच्या लढ्यात आपले योगदान द्यावे .असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी केले आहे.
"दोन थेंब जिंदगीचे... पोलिओला हरवूया, देशाला जिंकवूया!"


0 टिप्पण्या