Ticker

6/recent/ticker-posts

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दि.२६ जून २०२६ रोजी असलेल्या १५२ व्या जयंती निमित्त साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.


राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दि.२६ जून २०२६ रोजी असलेल्या १५२ व्या जयंती निमित्त साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज एक आदर्श लोकराजे

       आरक्षणाचे आद्य जनक, बहुजनांचे उद्धारकर्ते,समतेचे अग्रदूत,लोककल्याणकारी राजे,जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता निर्मूलनाचे प्रणेते,
वंचितांचे राजे,महाराष्ट्रातील एक महान राजे,समाजसुधारक, द्रष्टे लोकनेते,कोल्हापूर संस्थानाचा सुवर्णकाळ ठरलेले लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना दि.२६ जून २०२६ ला असलेल्या १५२ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ॥
      लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दि. २६ जून १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला आणि त्यांचे मूळ नाव 'यशवंतराव' होते.कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर यशवंतरावांना कोल्हापूर गादीचे वारसदार म्हणून दत्तक घेण्यात आले. दत्तक विधानानंतर त्यांचे नाव 'शाहू' असे ठेवण्यात आले.दि.२ अप्रैल १८९४ रोजी त्यांचा कोल्हापूर संस्थानाचे राजे म्हणून राज्याभिषेक झाला.शाहू महाराजांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात बहुजन समाज,दलित आणि वंचितांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले.त्यांनी महाराष्ट्रातील जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी ऐतिहासिक पावले उचलली .त्यांनी सर्वांसाठी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणारा कायदा केला.गरीब व ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी कोल्हापुरात विविध जातींच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे स्थापन केली.म्हणून त्यांना वसतीगृह चळवळीचे जनक म्हणतात.यामुळे बहुजन समाजातील शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली झाली.
शाहू महाराजांनी स्त्री शिक्षणाचा जोरदार पुरस्कार केला आणि बालविवाहाला कायदेशीर बंदी घातली.
 त्यांनी आपल्या संस्थानात आंतरजातीय आणि विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा कायदा मंजूर केला. अस्पृश्यतेविरुद्ध मोठा लढा दिला आणि दलितांना सार्वजनिक विहिरी व पाणवठे खुले करून दिले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील नेतृत्वगुण ओळखून त्यांना उच्च शिक्षणासाठी मोठी आर्थिक मदत केली.१९२० च्या माणगाव परिषदेत त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना दलितांचे खरे नेते म्हणून घोषित केले होते.शाहू महाराज हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते कृषी आणि उद्योगांचे देखील मोठे पाठीराखे होते.
शेतकऱ्यांना पाण्याचा तुटवडा भासू नये म्हणून त्यांनी राधानगरी धरणाची (लक्ष्मी तलाव) निर्मिती केली. कोल्हापूरला मोठी व्यापारी बाजारपेठ बनवण्यासाठी 'शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल' (शाहू मिल) सुरू केली.त्यांनी गुळाची बाजारपेठ स्थापन करून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून दिला.
         शाहू महाराज स्वतः उत्कृष्ट पैलवान होते आणि त्यांनी कुस्ती या खेळाला राजाश्रय दिला होता. कोल्हापूरला 'कुस्तीची पंढरी' बनवले आणि अनेक गरीब पैलवानांना आर्थिक मदत केली.कला,संगीत आणि नाटकांना त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले,ज्यामुळे कोल्हापूर सांस्कृतिक केंद्र बनले.त्यांच्या या महान सामाजिक कार्यामुळे . कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय सभेने १९१९ मध्ये त्यांना 'राजर्षी' (राजांचा ऋषी) ही पदवी दिली.त्यांनी जुन्या रूढी- परंपरांना छेद देऊन समाजात समता,बंधुता आणि न्याय प्रत्यक्षपणे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.त्यांचे विचार आणि कार्य कोणत्याही एका जातीपुरते मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीसाठी होते.राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात अस्पृश्यता निवारण आणि दलित (अस्पृश्य) बांधवांच्या उद्धारासाठी अत्यंत क्रांतिकारी आणि ऐतिहासिक पावले उचलली होती. केवळ कायदे न करता त्यांनी स्वतः आचरण करून समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता." आधी केले मग सांगितले " असे हे कर्ते सुधारक होते.शिक्षण क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या.शिक्षण सक्तीचे व मोफत केले.शाहू महाराजांनी दि.२४ नोव्हेंबर १९११ रोजी एक जाहीरनामा काढून आपल्या संस्थानात अस्पृश्य वर्गासाठी सर्व प्रकारचे शिक्षण पूर्णपणे मोफत केले.अस्पृश्य विद्यार्थ्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय व्हावी यासाठी त्यांनी १९०७ मध्ये कोल्हापूर येथे खास 'मिस क्लार्क वसतिगृह' सुरू केले.१९१९ मध्ये त्यांनी अस्पृश्यांसाठीच्या स्वतंत्र शाळा बंद करून त्यांना सर्वसामान्य मुलांसोबत एकाच शाळेत बसून शिकण्याचा ऐतिहासिक आदेश दिला.त्यांनी अस्पृश्य समाजातील सुशिक्षित तरुणांना संस्थानात तलाठी, कारकून आणि इतर महत्त्वाच्या सरकारी पदांवर नियुक्त केले.
           समाजातला जातीभेद मोडीत काढण्यासाठी त्यांनी गंगाराम कांबळे या दलित व्यक्तीला कोल्हापुरात चहाचे दुकान (सत्यशोधक हॉटेल) थाटून दिले. स्वतः महाराज तिथे जाहीरपणे चहा पिण्यासाठी जात असत, राजाला बघून सर्व जाती धर्मातील लोक गंगाराम कांबळेच्या हॉटेलमध्ये चहा घेऊ लागले.हा समतेचा संदेश  प्रत्यक्ष कृतीतून छत्रपती शाहू महाराजांनी जनतेला दिला. विहिरी,पाणवठे,विसावे आणि शासकीय रुग्णालये अस्पृश्यांसाठी खुली करण्याचे कायदेशीर आदेश त्यांनी दिले.१९१८ मध्ये त्यांनी जुलमी महार वतने रद्द केली आणि जमिनी रयतवारी पद्धतीने दलितांच्या नावावर केल्या. तसेच वेठबिगारीची प्रथा कायद्याने बंद केली.जातीभेद मुळापासून उखडून टाकण्यासाठी त्यांनी १९१८ मध्ये आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा कायदा मंजूर केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सहकार्य त्यांनी केले.शाहू महाराजांनी २१-२२ मार्च १९२० रोजी माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद भरवली. या परिषदेत त्यांनी, "तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने तुमचा खरा नेता मिळाला आहे," अशी ऐतिहासिक घोषणा केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या 'मूकनायक' या वृत्तपत्रासाठी महाराजांनी भरीव आर्थिक मदत केली, जेणेकरून शोषित समाजाचा आवाज लोकांपर्यंत पोहोचू शकेल.त्यांच्या याच अजोड आणि समतावादी कार्यामुळे त्यांना 'लोकराजा' आणि 'राजर्षी' या  पदव्या बहाल करण्यात आली.
          लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे भारतातील आरक्षणाचे आद्य जनक मानले जातात. त्यांनी सामाजिक समता आणि वंचित घटकांच्या उद्धारासाठी ऐतिहासिक पावले उचलली.५०% आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय शाहू महाराजांनी दि.२६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीय आणि बहुजन समाजासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षण लागू करण्याचा क्रांतिकारी जाहीरनामा काढला.हा भारतातील आरक्षणाचा पहिला अधिकृत शासकीय आदेश करवीर गॅझेटमध्ये प्रसिद्ध झालेला आहे.त्यांनी सामाजिक समता आणि वंचित घटकांच्या उद्धारासाठी हे ऐतिहासिक पाऊल उचलली.तत्कालीन प्रशासनात विशिष्ट उच्चवर्णीय घटकांचे प्रचंड वर्चस्व होते ते सुमारे ७० ते ८० टक्के पदावर होते.बहुजन,मराठा,कुणबी,दलित आणि इतर वंचित घटकांना प्रशासनात योग्य प्रतिनिधित्व मिळत नव्हते. ही विषमता मोडून काढण्यासाठी आणि प्रशासनात सामाजिक विविधता आणण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते. केवळ आरक्षण देऊन चालणार नाही, तर त्यासाठी सर्व स्तरातील लोकांना शिक्षण मिळाले पाहिजे हे ओळखून त्यांनी संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले.मराठा,जैन,लिंगायत, मुस्लिम,महार,चांभार अशा सर्व जातींमधील विद्यार्थ्यांसाठी कोल्हापुरात स्वतंत्र वसतिगृहे (Hostels) सुरू केली त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची संधी मिळू लागली. म्हणूनच या दूरगामी धोरणामुळे पुढील २० वर्षांत कोल्हापूर संस्थानातील प्रशासकीय रचनेत मोठा बदल झाला आणि बहुजन समाजाला मानाचे स्थान मिळाले ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे.
            दि.६ मे १९२२ रोजी मुंबईत लोकराजे छत्रपती शाहू महाराज अनंतात विलीन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अत्यंत दयाळू,पराक्रमी आणि पुरोगामी राजा गमावला. राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि सामाजिक सुधारणांचा वारसा आजही संपूर्ण भारताला प्रेरणा देत आहे.असे महान लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र वंदन करतो.

       डॉ.बाबासाहेब आंबेडकर
      साहित्यरत्न पुरस्कार प्राप्त
                  साहित्यिक 
        प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
         अमरावती .८०८७७४८६०९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या