चित्रा न्युज प्रतिनिधी
सावली : चंद्रपूर जिल्ह्यातील सावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या निर्मिती केंद्रावर (फॅक्टरी) स्थानिक गुन्हे शाखा, सावली पोलीस स्टेशन व अन्न सुरक्षा विभागाच्या संयुक्त पथकाने धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण ११ लाख ३१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावली परिसरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन व पॅकिंग सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, सावली पोलीस स्टेशन व अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या छापा टाकला. तपासणीदरम्यान फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन व पॅकिंग सुरू असल्याचे निदर्शनास आले.
कारवाईदरम्यान पथकाने HOLA आणि EAGLE ब्रँडचा हुक्का शिशा तंबाखू, खुला सुगंधित तंबाखू, तंबाखू पॅकिंगसाठी लागणारे विविध साहित्य, तसेच उत्पादन व पॅकिंगसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री (मशीन) जप्त केली. याशिवाय घटनास्थळी आढळून आलेले वाहन क्रमांक MH-34-CJ-9625 देखील ताब्यात घेण्यात आले.
अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच इतर संबंधित कायद्यांतर्गत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन, साठवणूक व विक्री केल्याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची किंमत अंदाजे ११ लाख ३१ हजार ४०० रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या धाडसी कारवाईमुळे परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या तंबाखू व्यवसायाला मोठा आळा बसला असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर उद्योगांवर पुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, सावली पोलीस स्टेशन आणि अन्न सुरक्षा विभागाच्या समन्वयातून ही कारवाई यशस्वीपणे पार पडली.


0 टिप्पण्या