सक्षमच्या न्यायासाठी संघर्ष सुरूच; आईच्या आरोपांवर आचलचा पलटवार
सात महिन्यांनंतर पुन्हा चर्चेत सक्षम ताटे प्रकरण
आचल मामीडवारचा धक्कादायक आरोप; सक्षमच्या लहान भावाकडून गैरवर्तन होत होते
नांदेड : नांदेडमधील गाजलेल्या सक्षम ताटे प्रकरणात आता नव्या आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. 27 नोव्हेंबर 2025 रोजी जुन्या नांदेड शहरात घडलेल्या या ऑनर किलिंग प्रकरणानंतर मृत सक्षम ताटेच्या प्रेयसी आचल मामीडवार हिने त्याच्या मृतदेहासोबत विवाह केल्याची घटना राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती.
घटनेला सात महिने उलटल्यानंतर सक्षम ताटे यांच्या आईने आचल मामीडवार हिने कुटुंबाला सोडून गेल्याचा आरोप करत, याच कारणामुळे आपल्या पतींचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. तसेच सक्षमला न्याय मिळवण्यासाठी आम्हाला एकट्यालाच लढावे लागत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, या सर्व आरोपांना आचल मामीडवार हिने प्रत्युत्तर दिले असून, सक्षमचा लहान भाऊ आपल्याशी गैरवर्तन करत असल्याने आपण घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. तसेच सक्षमच्या वडिलांचा मृत्यू हा आजारपणामुळे झाल्याचेही तिने स्पष्ट केले. यासोबतच, समाजमाध्यमांवर तिच्याबाबत होत असलेल्या टीका आणि ट्रोलिंगबाबत नाराजी व्यक्त करत, सत्य परिस्थिती जाणून घेतल्याशिवाय कोणावरही आरोप करू नयेत, असे आवाहनही आंचल मामीडवार हिने केले आहे.
याशिवाय, आपण स्वतःहून घर सोडले नसून पोलीस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसारच आपल्याला आजीच्या घरी सोडण्यात आल्याचा खुलासाही आचल मामीडवार हिने केला आहे.
एकेकाळी राज्यभर चर्चेत असलेल्या या प्रकरणात आता नव्या आरोप-प्रत्यारोपांमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, पुढे नेमकं काय घडतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


0 टिप्पण्या