डॉ. पूजा उर्फ ज्योती देऊळकरने जागतिक योगासन स्पर्धेत पटकावले सुवर्ण; ऐतिहासिक विजय मिरवणुकीने शहर दणाणले
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती: "भद्रावतीची लेक, देशाची शान!" हे शब्द खरे ठरवत डॉ. पूजा उर्फ ज्योती देवराव देऊळकर हिने गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत 35 ते 45 वयोगटात सुवर्णपदक पटकावून भारताचा आणि भद्रावतीचा मान उंचावला आहे.
या ऐतिहासिक यशानिमित्त 11 जून रोजी भद्रावतीत तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्व. बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार येथे आगमन होताच श्री गुरुदेव सेवा सुंसंस्कार समिती, श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि अष्टांग योगासन महाधारी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीत नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, गुरुदेव भक्त, चिकुले, पत्रकार, व्यापारी, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, भजनी मंडळे तसेच असंख्य महिला-पुरुष मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. स्वामी ब्रह्मानंद मंदिर परिसरात समारोपाचा कार्यक्रम पार पडला.
संघर्षातून सुवर्णझेप
मूळच्या मांगली येथील रहिवासी असलेल्या देऊळकर कुटुंबाने कन्येच्या उपचारासाठी व प्रशिक्षणासाठी मोठा संघर्ष केला. प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि आरोग्याच्या समस्यांवर मात* करत डॉ. पूजाने अविरत परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर योगासन क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक यश संपादन केले आहे.
डॉ. पूजा देऊळकर काय म्हणाल्या?
"प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता सातत्याने साधना करत राहिले. जागतिक स्तरावरील स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून देशाचा गौरव वाढविला याचा आनंद साजरा करताना शहरभर 'भारत माता की जय'च्या घोषणा आणि ढोल-ताशांच्या गजराने वातावरण भारावून गेले."
धार्मिक मिरवणुका भद्रावतीकरांसाठी नवीन नसल्या तरी क्रीडा क्षेत्रातील जागतिक यशासाठी प्रथमच इतक्या भव्य स्वरूपात काढण्यात आलेली ही विजय मिरवणूक विशेष ठरली. गुरुदेव भक्तांचे शिस्तबद्ध नियोजन यामुळे कार्यक्रमाला वेगळीच उंची प्राप्त झाली.
------------------------------ ----------
भद्रावतीच्या लेकीने रचला इतिहास!
डॉ. पूजा उर्फ ज्योती देऊळकरने अहमदाबादच्या जागतिक योगासन स्पर्धेत 35-45 वयोगटात सुवर्णपदक पटकावले. भारताचे प्रतिनिधित्व करत देशाचा मान वाढवला. 11 जूनला ढोल-ताशात भव्य मिरवणूक. आर्थिक अडचणी, आजारपणावर मात करत मिळवले यश. 'भारत माता की जय' ने दुमदुमले शहर!


0 टिप्पण्या