११२ वाहनांवर कारवाई
१ लाख ६७ हजाराचा दंड *
चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली: -परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य व मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी तथा पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ( एस. टी. ) जिल्ह्यात दि. ५ जून २०२६ ते १५ जून २०२६ या कालावधीत अवैध प्रवासी वाहतुक विरोधात विशेष धडक मोहीम राबविण्यात आली. उच्च न्यायालयाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार एस.टी. बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी राहू नयेत यासाठी ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. सुरक्षा व दक्षता अधिकारी मोहन कानफाडे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय वाहतूक अधिकारी शीतल शिरसाट, सुरक्षा निरीक्षक हरीश इंगोले, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक अजिंक्य रहांगडाले, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक शेषराव धनभाते तसेच भंडारा विभागातील सर्व आगार व्यवस्थापक यांनी पोलीस विभाग व प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांच्याशी समन्वय साधून ही कारवाई केली. या विशेष मोहिमेदरम्यान पोलीस विभाग व आरटीओ विभागामार्फत एकूण ११२ अवैध प्रवासी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईतून एकूण १ लाख ६७ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान या संपूर्ण मोहिम दरम्यान भंडारा विभागाचे विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक सूचना दिल्यात. अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी आणि एस. टी. महामंडळाच्या प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा प्रकारच्या मोहिमा भविष्यातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे विभागीय सुरक्षा व दक्षता विभागाचे सूत्रांनी सांगितले.


0 टिप्पण्या