👉भरारी पथके अधिक सक्रिय करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
👉शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज
चित्रा न्युज प्रतिनिधी
गडचिरोली : खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते व कीटकनाशके वेळेत आणि योग्य दरात उपलब्ध व्हावीत, तसेच बोगस बियाणे विक्री, साठेबाजी आणि जादा दराने खतविक्रीच्या प्रकारांना आळा बसावा यासाठी एमआरपीपेक्षा अधिक दराने खते किंवा बियाण्यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासह परवाना रद्द करण्याची कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित “कृषी निविष्ठा उपलब्धता व गुणवत्ता नियंत्रण” विषयक जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी किरण खोमणे, मोहीम अधिकारी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, कृषी विभागाचे अधिकारी, बियाणे व खत कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच जिल्हा डीलर्स व रिटेलर्स असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख पीक धान असून बहुतांश शेतकरी खरीप हंगामावर अवलंबून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरील भरारी पथके अधिक सक्रिय करण्यात येणार आहेत. कोणताही विक्रेता छापील कमाल किरकोळ किंमतीपेक्षा (एमआरपी) अधिक दराने विक्री करत असल्याचे अथवा कृत्रिम टंचाई निर्माण करत असल्याचे आढळल्यास त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल.
बैठकीत कृषी निविष्ठांच्या विक्रीतील अनियमितता रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. खत किंवा बियाण्यांसोबत इतर अनावश्यक उत्पादने खरेदी करण्याची सक्ती शेतकऱ्यांवर करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच कृषी केंद्रांमधील उपलब्ध साठ्यांची नियमित तपासणी करून बियाणे व खतांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण व्हावे यासाठी जिल्हास्तरावर विशेष निविष्ठा तक्रार निवारण कक्ष कार्यरत करण्यात आला आहे. बियाणे, खते किंवा कीटकनाशकांबाबत कोणतीही तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी थेट कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. तक्रार निवारण कक्षाचा मोबाईल क्रमांक 8275690169 उपलब्ध करून देण्यात आला आहे.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. सध्या जिल्ह्यात १,४९४ मेट्रिक टन युरिया आणि २०० मेट्रिक टन डीएपी खताचा बफर साठा उपलब्ध आहे. पावसाळ्यात दुर्गम भागातील वाहतूक अडचणी लक्षात घेऊन संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त खतसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता गरजेनुसारच खतांची खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
खरीप हंगाम कोणत्याही अडचणी शिवाय यशस्वी करण्यासाठी महसूल, कृषी आणि पोलीस प्रशासनाने परस्पर समन्वय राखून काम करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.


0 टिप्पण्या