27 वर्षीय तोहिद शेख अटकेत; मशीन, कारसह प्रतिबंधित तंबाखूचा साठा हस्तगत
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंंद्रपूर : मुल शहरात घराच्या आडोशाला सुरू असलेल्या बनावट व प्रतिबंधित सुगंधित तंबाखू निर्मितीच्या अवैध उद्योगाचा स्थानिक गुन्हे शाखा व मुल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत तब्बल 9 लाख 85 हजार 445 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपी अटकेत आहे.
विश्वसनीय गुप्त माहितीनुसार, ताडाळा रोडवरील तोहिद शेख हा युवक महाराष्ट्रात बंदी असलेला सुगंधित तंबाखू व पानमसाला साठवून विक्री करत होता. याशिवाय स्वतःच्या घरातच बनावट तंबाखू तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि मुल पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्त कारवाई करत आरोपी मोहम्मद तोहिद मोहम्मद आरिफ (वय 27) याच्या घरावर छापा टाकला.
यात तंबाखू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व मशीन मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखू व पानमसाला साठा, वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी MH-27 BV-2907 क्रमांकाची कार जप्त करण्यात आले.
आरोपी व मुद्देमाल अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर यांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता व अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत गुन्हा नोंद करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास मुल पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलीस निरीक्षक अमोल काचोरे (LCB, चंद्रपूर), पोलीस निरीक्षक विजय राठोड (मुल), पोउपनि संतोष निंभोरकर, विनोद भुरले, रूपेश कुंभरे, पोलीस अंमलदार धनराज करकाडे, जंयत चुनारकर, चेतन गज्जलवार, सुरेंद्र महतो, सुमित बरडे, प्रफुल्ल गारघाटे, किशोर वाकाटे, दिपीका सोडणार तसेच सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूरचे कर्मचारी करीत आहे
_____________________________________
घरातच 'गुटखा फॅक्टरी'! मुलात LCB चा मोठा छापा
ताडाळा रोडवरील तोहिद शेखच्या घरातून बनावट सुगंधित तंबाखू बनवण्याचे मशीन, प्रतिबंधित साठा व कारसह 9.85 लाखांचा माल जप्त. 27 वर्षीय आरोपी अटकेत. FDA कडे गुन्हा दाखल. या रॅकेटमागे आणखी कोण? तपास सुरू.


0 टिप्पण्या