Ticker

6/recent/ticker-posts

खाजगी शाळांचा 'पुस्तक घोटाळा' उघड! MRP च्या नावाखाली पालकांची लूट


ग्राहक पंचायतचा दणका: 'बालभारती-NCERT' ची पुस्तकेच बंधनकारक करा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती:शिक्षणाच्या नावाखाली खाजगी शाळांनी सुरू केलेल्या 'पुस्तक विक्रीच्या गोरखधंद्या' विरोधात आता ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावती आक्रमक झाली आहे. स्टेट बोर्डच्या शाळांना बालभारती व CBSE शाळांना NCERT ची पुस्तकेच बंधनकारक करा, अशी ठोस मागणी करणारे पत्र तहसीलदार राजेश भांडारकर यांच्यामार्फत थेट शालेय शिक्षण मंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.

 शाळेतूनच घ्यावी लागतात पुस्तके खाजगी शाळा विद्यार्थ्यांना 'विशिष्ट प्रकाशना'ची पुस्तके स्वतःच्या काउंटरवरूनच घेण्यास भाग पाडतात  ही पुस्तके बाहेर कोणत्याही दुकानात उपलब्ध नसतात. पालकांना पर्यायच उरत नाही. पुस्तकांची छापील किंमतच अवाजवी ठेवल्याने  शाळा 'भरगच्च कमाई' करत आहेत. हे शिक्षण आहे की दुकानदारी'? असा पालकांचा संताप होत आहे.

"शिक्षणासोबतच पुस्तके विक्रीचा मोठा गोरखधंदा खाजगी शाळांनी उभारला आहे. महागड्या पुस्तकांमुळे पालकांना प्रचंड आर्थिक भार सहन करावा लागत आहे. अनेक पालक कर्ज काढून मुलांची फी व पुस्तके घेत आहेत," असे ग्राहक पंचायतचे अध्यक्ष प्रवीण चिमुरक यांनी सांगितले.

स्टेट बोर्ड शाळा फक्त बालभारती प्रकाशनाची पुस्तके व अभ्यासक्रम बंधनकारक करा.,CBSE शाळा फक्त NCERT प्रकाशनाची पुस्तके बंधनकारक करा. ही पुस्तके बाजारात सहज व स्वस्त दरात उपलब्ध आहेत. शाळेतील 'पुस्तकांची दुकाने' आपोआप बंद होतील. अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांनी केली आहे.

दरवर्षी जूनमध्ये हाच सावळा गोंधळ होतो. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना हे 'पुस्तक रॅकेट' दिसत नाही का? की 'हप्ते' घेऊन डोळेझाक केली जाते? शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरू होण्यापूर्वीच शासनाने GR काढून पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

पत्र देताना ग्राहक पंचायतचे भारत खोब्रागडे, विनोद ठमके, सोनल वावरे, गुरुदेव बावणे, नामदेव रामटेके व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

------------------------------------------------------
खाजगी शाळांचा 'पुस्तक घोटाळा' बंद करा!
 
भद्रावती ग्राहक पंचायत आक्रमक. शाळेतूनच महागडी पुस्तके घेण्याची सक्ती का? MRP 500, किंमत 50! बालभारती व NCERT ची पुस्तके बंधनकारक करा, म्हणजे बाजारात स्वस्त मिळतील. शिक्षणमंत्र्यांना पत्र. पालकांनो, जागे व्हा! शाळेची 'दुकानदारी' बंद पाडा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या