Ticker

6/recent/ticker-posts

५ जुलैला राळेगणसिद्धीतून राज्यव्यापी 'शिव पाणंद शेतरस्ता जनजागरण यात्रे'चा शुभारंभ

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते प्रारंभ; 
'मिशन झिरो पेंडन्सी'साठी राज्यभर जनजागृती


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अहिल्यानगर : राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला हक्काचा, दर्जेदार शेतरस्ता मिळावा आणि शेतरस्त्यांच्या प्रलंबित प्रश्नांची कायमस्वरूपी सोडवणूक व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने रविवार, ५ जुलै रोजी राळेगणसिद्धी येथून राज्यव्यापी 'शिव पाणंद शेतरस्ता जनजागरण यात्रा' व पदाधिकारी सन्मान अभियानाचा शुभारंभ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी दिली.
क्रांतीकारक, राष्ट्रभक्त आणि समाजसेवकांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी–नारायणगव्हाण शेतरस्त्याच्या संघर्षातून शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचा जन्म झाला. "माझा रस्ता होवो अथवा न होवो; शेवटच्या शेतकरी बांधवाला हक्काचा शेतरस्ता मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही," या निर्धारातून सुरू झालेली ही चळवळ आज राज्यव्यापी जनआंदोलन बनली आहे. "शेत तिथे रस्ता... गाव तिथे समृद्धी" हा संदेश घेऊन चळवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे.
शरद पवळे म्हणाले, ही चळवळ कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून, शेतरस्ते अडवून शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात आणि प्रशासकीय त्रुटींमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांविरोधातील विधायक संघर्ष आहे. शेतरस्ता बंद झाला की केवळ रस्ता बंद होत नाही, तर एका शेतकरी कुटुंबाच्या आशा, स्वप्ने आणि भविष्याचा मार्गही बंद होतो. अनेक कुटुंबांना आर्थिक नुकसान, न्यायालयीन लढे, सामाजिक तणाव, नातेसंबंधांतील दुरावा आणि काही वेळा आत्महत्येसारख्या टोकाच्या घटनांनाही सामोरे जावे लागते. या वेदनेतूनच शिव पाणंद चळवळीची उभारणी झाली.
शेतरस्त्यांच्या प्रश्नावर झालेल्या न्यायालयीन लढ्यात ॲड. प्रतिक्षा काळे यांनी प्रभावी बाजू मांडत महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले. अर्जानंतर ६० दिवसांत निशुल्क हद्दनिश्चितीसह शिवरस्ता खुला करण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेले आदेश शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरले. त्याचबरोबर शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून नकाशावरील रस्ते, प्रलंबित शेतरस्ता प्रकरणे आणि शेतकऱ्यांच्या अडचणी प्रभावीपणे मांडण्यात आल्या.
चळवळीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आणि जलत्यागाच्या इशाऱ्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून शेतरस्त्यांबाबत महत्त्वपूर्ण शासननिर्णय झाले. मात्र हे निर्णय प्रत्यक्षात प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. यासाठीच 'मिशन झिरो पेंडन्सी' या संकल्पनेतून राज्यभर जनजागृती केली जाणार असून, प्रत्येक प्रलंबित शेतरस्ता प्रकरण निकाली काढण्यासाठी ही यात्रा महत्त्वाची ठरणार असल्याचे पवळे यांनी सांगितले.
राज्यातील सर्व शेतकरी, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या जनजागरण यात्रेला बळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

: आंदोलनाला यश; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने मिळाले मोठे बळ


अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर न्यायालयीन आदेश आणि शासननिर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिव पाणंद शेतरस्ता चळवळीने केलेल्या पेरू वाटप आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ यांनी शिवरस्त्यांच्या निशुल्क मोजणी व हद्दनिश्चितीबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले. या निर्णयामुळे शेतकरी चळवळीला मोठे बळ मिळाले.
आज ही चळवळ अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, पुणे (शिरूर, जुन्नर, आंबेगाव, दौंड), सातारा, कोल्हापूर, ठाणे तसेच राज्यातील अनेक जिल्हे, तालुके आणि गावांपर्यंत पोहोचली आहे. "प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत हक्काचा दर्जेदार सिमेंटचा शेतरस्ता पोहोचेपर्यंत आमचा संघर्ष अखंड सुरू राहील," असा निर्धार शरद पवळे यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या