Ticker

6/recent/ticker-posts

तलाव पाळ कचरामय झाल्याने ३ वार्डातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात


रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:- सध्या पावसाळा सुरू आहे. स्वच्छतेच्या बाबतीत आरोग्य विभाग दरवर्षीच पावसाळ्यात सावधगिरी बाळगीत असते. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तलाव वार्ड या मार्गावरील तलाव पाळ संपूर्ण कचरामय झाल्याने तलाव पाळ परिसरातील  नागरिकांचे आरोग्य संपूर्ण धोक्यात आलेले आहे. सविस्तर प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पावसाळा ऋतूला सुरुवात झालेली आहे. या पावसाळा ऋतूत आरोग्य विभाग, नगरपरिषद प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासन आणि इतरही विभाग अलर्ट असतात, सतर्क असतात. वार्डातील वेळोवेळी स्वच्छता करणे, निर्जंतुक पिण्याचे पाणी देण्याची जबाबदारी अशावेळी प्रशासनाची असते. पावसाळ्यात स्वच्छता, सार्वजनिक विहिरी, कूपनलिका यातून स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळवून देण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. काही वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तलाव वार्ड असा रस्ता तयार करण्यात आला. हा रस्ता तलावपाळ रस्ता म्हणून संपूर्ण परिसराला माहिती आहे. सध्या या तलाव पाळीला हिरवेगार वृक्ष असल्याने नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे. परंतु या तलाव पाळीवर याच परिसरातील बेअक्कल नागरिक कचरा टाकून स्वतःचाच परिसर खराब करीत असल्याची माहिती आहे. काही दिवसांपासून ३ चाकी कचरा हातगाडी परिसरात येत नसल्याने नागरिकांनी तलाव पाळीवर कचरा टाकणे सुरू केले. त्यामुळे सध्या संपूर्ण तलावपाळ कचरामय झालेली आहे. एक तर अनेक दिवसांपासून तलाव पाळीवर पडलेला कचरा उचलण्याचे सौजन्य यापूर्वी नगरपरिषदेने दाखविलेले नाही. त्यात  काही दिवसांपासून कचरा गाडी येत नसल्याने नवीन कचऱ्याची भर पडली त्यामुळे तलावपाळ कचरामय झालेली आहे. या परीसरात ३ वार्डातील नागरिक राहतात. पावसाळ्याला सुरुवात झाल्याने कचरा सडून दुर्गंधी येऊ लागलेली आहे. यातून कीटकजन्य आजार पसरण्याची शक्यता आहे. सदर कचरा लवकरात लवकर न उचलल्यास यातून रोगराई निर्माण होऊन परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
_______________________________________________
                 नगरपरिषद प्रशासन करते तरी काय ?
_______________________________________________

साकोली-सेंदूरवाफा नगर परिषदेकडे कचरा उचलण्याकरिता एक ट्रॅक्टर असून स्वच्छता विभागाची एक स्वतःची यंत्रणा आहे. मग हा कचरा त्यांना का दिसत नाही ? गत दीड ते दोन महिन्यापासून तलाव पाळीवर कचरा साचत आहे याची दखल कशीच कुणी घेतली नाही ? नगर परिषदेचा स्वच्छता विभाग काय करतो ? पावसाळ्यात संपूर्ण १० प्रभागातील स्वच्छतेविषयी माहिती घ्यायला काय हरकत आहे ? प्रत्येक वेळी या तलाव पाळीकडे दुर्लक्ष का करण्यात येते ? गुजरी मधीलसुद्धा कचरा या पाळीवर टाकला जातो. तलाव पाळीवरील ज्यांच्या घरासमोर अधिकाधिक कचरा दिसेल त्यांना नगरपरिषद नोटीस का बजावीत नाही ? आपला वैयक्तिक धंदा करायचा आणि तलाव पाळीवर कचरा फेकणाऱ्यांकडे नगरपरिषद दुर्लक्ष करण्याचे कारण काय ? अशी परिस्थिती या परिसरात निर्माण झालेली आहे.
_______________________________________________

तलाव पाळीवर कचरा फेकण्याची ही नित्याची बाब झालेली आहे. स्वतःच्या घरातील आणि दुकानातील टाकाऊ माल तलाव पाळीवर फेकून हा मुजोरी दाखविण्याचा एक प्रकार आहे. अशाकडे नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करीत करण्याचे कारण नाही. नोटीस बजावून कारवाई करण्याची धमक दाखवावी. मोजक्या घरातील आणि दुकानतील कचरा तलाव पाळीवर फेकत असल्याने संपूर्ण परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. साकोली-सेंदुरवाफा नगरपरिषद प्रशासन निदान आता तरी या महत्त्वपूर्ण गोष्टीकडे लक्ष देईल का ? प्रत्येकवेळी प्रसिद्धी  माध्यमांना पुरावे द्यावे लागत असतील तर नगरपरिषद प्रशासन झोपेत आहे असेच म्हणावे लागेल. 

किशोर बावणे. प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी.
समाजसेवक,
फ्रीडम फायडर सदस्य, गणेश वार्ड साकोली.
_______________________________________________

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या