चित्रा न्युज प्रतिनिधी
जुने दानवाड :-इचलकरंजी महानगरपालिकेमार्फत शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड येथील कृष्णा-दूधगंगा नदी संगमावरून प्रस्तावित करण्यात आलेल्या अतिरिक्त ८९ एमएलडीच्या 'राधाकृष्ण पाणी योजनेविरोधात' दानवाड पंचक्रोशीतील शेतकरी आणि ग्रामस्थांमधे तीव्र संताप पसरला आहे. या अन्यायकारक आणि बेकायदेशीर पाणी उपसा प्रकल्पाविरुद्ध **'राधाकृष्ण संगमभूमी जलआक्रोश समिती'**च्या वतीने आज क्रांतीदिनी (९ ऑगस्ट २०२६) सकाळी ११:०० वाजता जुने दानवाड येथील तलाठी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणाला प्रारंभ करण्यात आला आहे
प्रस्तावित प्रकल्पामुळे दानवाड पंचक्रोशीतील बागायती शेती, भूजल पातळी, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच ग्रामीण पशुधन संकटात सापडणार असून, या भागाची संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेल्या जगण्याच्या अधिकारावर (कलम २१) आणि जलसुरक्षेवर या योजनेमुळे थेट गदा येत असल्याचे समितीने म्हटले आहे.
या प्रकल्पाविरुद्ध यापूर्वी प्रशासनाला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला कायदेशीर व लेखी स्वरूपात हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. मात्र, प्रशासकीय पातळीवर कोणतीही ठोस किंवा न्याय्य कारवाई न झाल्याने ग्रामस्थांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला आहे.
जुने दानवाड उद्भव स्रोतावर सध्या अस्तित्वात असलेल्या इतर गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा नेमका ताण किती आहे, याची सविस्तर आकडेवारी व उन्हाळ्यातील प्रत्यक्ष विसर्गाची वस्तुस्थिती जाहीर करावी.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत तयार करण्यात येणाऱ्या पूर्व व्यवहार्यता अहवालातील तांत्रिक निकष आणि भूजल पातळीवरील परिणामांचा वैज्ञानिक अभ्यास जाहीर करावा.
या भागातील शेती व पिण्याच्या पाण्याचा कोटा सुरक्षित राहण्याबाबत प्रशासनाने कायदेशीर हमी द्यावी.
जोपर्यंत या संपूर्ण योजनेची सत्यता स्पष्ट करणारी श्वेतपत्रिका लेखी स्वरूपात सादर केली जात नाही, तोपर्यंत केवळ तोंडी आश्वासनांवर आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.जोपर्यंत ही जनविरोधी पाणी योजना कायमस्वरूपी रद्द केली जात नाही, तोपर्यंत हा लढा असाच तीव्र स्वरूपात सुरू राहील, असे समितीने म्हटले आहे.
यावेळी श्री. संजय धनगर (माजी सरपंच, नवे दानवाड)
अॅड. राहुलराज कांबळे'श्री. दिनेश कांबळे 'श्री. संतोष आठवले (पँथर आर्मी प्रमुख) हे आजपासुन बेमुदत साखळी उपोषणास बसले आहेत .
दरम्यान इचलकरंजी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व मलनिःसारण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जारी केलेल्या पत्राAccording नुसार, माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १८ जून २०२६ रोजी पार पडलेल्या बैठकीत यास मंजुरी देण्यात आली आहे. १३ जुलै २०२६ च्या इतिवृत्तानुसार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पूर्व व्यवहार्यता अहवाल शासनास सादर होऊन मंजुरी मिळाल्यानंतरच सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार केला जाईल. तसेच, यायोजनांतर्गत महाराष्ट्रातील कोणत्याही गावाच्या पाणीपुरवठा योजनेवर परिणाम होणार नसल्याची खबरदारी घेतली जाईल, असे स्पष्ट करत मा. आयुक्तांच्या मान्यतेने साखळी उपोषण स्थगित करण्याची विनंती प्रशासनाने केली आहे.तसेच नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यासाठी सदर प्रकरण मा. आयुक्त (इचलकरंजी महानगरपालिका), मा. जिल्हाधिकारी (कोल्हापूर) आणि उपविभागीय अधिकारी (इचलकरंजी) यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. प्रशासकीय स्तरावर कार्यवाही सुरू असल्याने नियोजित उपोषण स्थगित करून सहकार्य करावे, असे आवाहन नि.ना. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी क्रांती पाटील यांनी केले आहे .कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कुरूंदवाड पोलीस ठाण्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षकांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १६८ अन्वये संतोष आठवले यांना सक्त नोटीस बजावली आहे. आंदोलनादरम्यान सनदशीर मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या आंदोलनात जुने दानवाड गावचे माजी सरपंच सुकुमार पाटील माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबगोंडा पाटील ' खंडेराव चव्हाण , नवे दानवाड ग्रा.प सदस्य श्रावण कांबळे सज्जनसिंग रजपुत , नितिन पाटील ' अनिल पाटील, बंडू लाडखान' शंकर अंबुपे ' गणी देसाई ' संजय कांबळे , मकरंद पाटील ' शहानुर गवंडी ' विठ्ठालसिंग रजपूत , अदिनाथ पाटील , प्रकाश मनोहर निप्पाणावर ' हमीदभाई सनदी ' अविनाश सुतार , सोमनाथ कांबळे ' कुमार रजपुत ' रमेश तिप्पाणावर ' प्रल्हाद सांळुखे ' दिग्विजय कांबळे ' अनगोंडा पाटील ' नेमगोंडा पाटील ' बाबासो कांबळे , आप्पासो कांबळे 'पांडूरंग धनगर ' रविदास निर्मळे आदीच्या सह नवे जुने दानवाड गावातील शेतकरी 'पशुपाल व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला .


0 टिप्पण्या