Ticker

6/recent/ticker-posts

पंचायत समितीचा वर्धापन दिन तहसीलचा स्वातंत्र्य दिन चिरायू हो !


रवि भोंगाने  चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:- अनेक वर्षानंतर साकोली शासकीय कार्यालयात स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाच्या पत्रिकेवरून गोंधळ दिसून आलेला आहे. त्यामुळे साकोली पंचायत समिती कार्यालय स्वातंत्र्याचा ७९ वा वर्धापन दीन साजरा करणार असून तहसील कार्यालय ८० वा स्वातंत्र्य साजरा करणार आहे. मात्र एका पत्रिकेत वर्धापन दिन आणि एका पत्रिकेत स्वातंत्र्य दिन लिहिला गेला असल्याने निमंत्रितांकरिता चांगलीच डोकेदुखी ठरली. सविस्तर बातमी अशी की, प्रत्येक वर्षी साकोली येथे शासकीय कार्यालयात स्वातंत्र्य दिन, गणराज्य दिन, आणि महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्या कार्यक्रमाच्या पत्रिका स्थानिक प्रतिष्ठित नागरिक आणि प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींना दिल्या जातात. मात्र या वेळीच्या स्वातंत्र्य दिनाची जी पत्रिका पंचायत समितीकडून देण्यात आली त्यात ७९ व्या स्वातंत्र्य वर्धापन दिनाचा उल्लेख आहे तर तहसील कार्यालयाने पाठवलेल्या पत्रिकेमध्ये ८० व्या स्वातंत्र्य दिनाचा उल्लेख आहे. दोन्ही विभाग आपापल्या ठिकाणी बरोबर असले तरी पंचायत समितीच्या शासकीय पत्रिकेत स्वातंत्र्याचा वर्धापन दिन या शब्दाचा उल्लेख असल्याने चर्चेला वेगळीच रंगत आली एवढे मात्र खरे.
--------------------------------------------
           प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींना पत्रिकाच नाही 
----------------------------------------------
साकोली पंचायत समिती ही साकोली तालुक्यातील महत्त्वाची पंचायत समिती मानली जाते. आमदार नाना पटोले यांच्या तालुक्यातील ही पंचायत समिती असल्याने याला अधिक महत्त्व येते. शासकीय कार्यालयीन कामाच्या प्रसिद्धीकरिता प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींना बोलाविले जाते. मात्र अनेकदा या कार्यालयाच्या शासकीय कार्यक्रम संबंधित पत्रिका प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी पर्यंत पोहोचत नाही. केवळ स्वतःच्या कार्याचा गौरव करायचा असेल तर पंचायत समितीच्या प्रशासनाला प्रसिद्धी माध्यमाची आठवण येते. आम सभा असली की विशेष आठवण येते. सुरुवातीला काही वर्षापर्यंत या कार्यालयाकडून वेळोवेळी शासकीय कार्यक्रमाच्या पत्रिका प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधीपर्यंत पोहचायच्या. मात्र काही वर्षापासून या बाबींकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. शासकीय कार्यक्रमाच्या पत्रिका प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधीपर्यंत पोहोचविण्याकडे येथील अधिकाऱ्याचे दुर्लक्ष होत आहे. दरवेळेस  पंचायत समिती कार्यालयातील शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका पोहोचविण्याचे सौजन्य येथील खंडविकास अधिकारी दाखवित  नाही.
_______________________________________________
 
   प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी कोण हेच माहीत नाही 
-----------------------------------------------

महसूल ( तहसील ) विभाग तालुक्यातील महत्त्वाचा विभाग. विशेषता: निवडणूक आणि आपत्कालीन परिस्थितीत या विभागाला प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींची आवर्जून आठवण येते आणि गरजही भासते. त्यावेळी या विभागाचे पत्रकारांशिवाय पानही हलत नाही. दरवेळी हा विभाग पत्रकार परिषदेकरिता पत्रकारांना निमंत्रित करीत असते. मात्र या विभागाला अद्यापही कोणत्या वृत्तपत्राचे कोण पत्रकार आहेत याचीच माहिती नाही. जे वृत्तपत्रात काम करीत नाही त्यांच्याही नावाचा उल्लेख यांच्या यादीत आहे. विशेष म्हणजे साकोलीत काही सन्माननीय पत्रकार दिवंगत झाले. मात्र त्यांच्याही नावाने स्वातंत्र्य दिनाच्या पत्रिका पाठविण्याचा विक्रम या कार्यालयाने केला. विद्यमान काळात कोण प्रतिनिधी कोणत्या वृत्तपत्रात कार्य करतात ? त्यापैकी दिवंगत सन्माननीय प्रतिनिधी कोण ? आणि खरेच कोण व्यक्ती कोणत्या वृत्तपत्रात लिहितात त्याची नवीन यादी करण्याची या विभागाला गरज वाटत नाही. बाबा आजमचा काळ समजून हा विभाग शासकीय कार्य करीत आहे काय ?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या