रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली: महाराष्ट्र राज्यात जे काही ६ व्याघ्र प्रकल्प केंद्र आहेत त्यात भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प महत्वपूर्ण व्याघ्र प्रकल्प आहे. तस्करांच्या विळख्यात वाघाची शिकार आणि वाघाच्या शिकारीत मानवाची शिकार हे दुर्दैवी चक्र सुरू असतांना अस्वल या वन्य प्राण्याच्या हल्ल्यात वनपाल अधिकाऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याने सुरक्षा आणि सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्याने ऐरणीवर आलेला आहे.
केवळ व्याघ्र प्रकल्प नव्हे तर व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेर देखील वन्यप्राणी मानवास आपली शिकार बनवीत असल्याने संबंधित विभागाला आता डोके खाजवायची वेळ आलेली आहे. नवेगाव -नागझिरा व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्रातील नागझिरा ब्लॉक अंतर्गत उमरझरी वन परिक्षेत्रात बंदरझरा बीटमध्ये ५ ऑगस्ट २०२६ रोजी अस्वलाच्या घडलेल्या दुर्दैवी हल्ल्यात वनरक्षक शामू शरणागत यांचा मृत्यू झाला. त्यानंतर व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेर म्हणजे लाखनी तालुक्यातील राजेगाव एमआयडीसी परिसरात हरवलेल्या ११ वर्षीय बालकाचा शोध घेत असतांना शोध मोहिमेवर असलेल्या लाखनी पोलिसांच्या पथकावर अस्वलने हल्ला केला. या हल्ल्यात ६ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे गंभीर जखमी होऊन जीव जाण्यापासून वाचले. त्यामुळे वन्य प्राणी मानव संघर्ष अटळ असला तरी दोन्ही ठिकाणी नागरिक आणि अधिकारी सुरक्षित नाही हे कटू सत्य यानिमित्ताने समोर आलेले आहे.
--------------------------------------------
वनमंत्र्यांनी दिले प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश
---------------------------------------------
नवेगाव-नागझिऱ्यातील उमरझरी जंगल परिसरात अस्वलाच्या हल्ल्यात शामू शरणागत या वनपालाचा दुर्दैव मृत्यू झाला. जंगलात गस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सुरक्षेच्या प्रश्न या निमित्ताने समोर आलेला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची ऑनलाईन बैठक काही दिवसांपूर्वी घेतली. या बैठकीत कर्मचाऱ्यांची सुरक्षा व अन्य कामांबाबत तात्काळ प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती समोर आलेली आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात एक संघ नियंत्रणप्रणाली सुरू झाली. त्यामुळे भंडारा प्रादेशिक विभाग, गोंदिया प्रादेशिक विभाग तसेच एफडीसीएमकडे असलेले बफरक्षेत्र थेट व्याघ्र प्रकल्पाच्या नियंत्रणाखाली आलेली आहेत. पर्यायाने व्याघ्र प्रकल्पाचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढल्याने कर्मचाऱ्यांवरही ताण पडत आहे. माहितीनुसार नव्याने समाविष्ट झालेल्या वनपरिक्षेत्रात वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडे पुरेसे संरक्षण साहित्य नाहीत. स्टिक, गमबूट, स्प्रे, आदी साहित्य नसल्याने जंगलात गस्त करतांना कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वनमंत्र्यांच्या बैठकीत हा मुद्दा आवर्जून उपस्थित झाल्यानंतर वनमंत्र्यांनी तातडीने सुरक्षा साहित्य पुरविण्याचे निर्देश दिलेले आहेत. या सोबतच गस्त करतांना वन कर्मचाऱ्यांसोबत पुरेसे वनमजूर सोबतीला देण्यात यावे असेही निर्देश दिलेले आहेत. व्याघ्र प्रकल्पात असलेले गावकरी जंगलात आपली गुरे जाण्यासाठी नेतात. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होत असतो. या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी पर्यायी रोजगार देण्यासाठी, प्रोत्साहित करण्यावरही चर्चा झाली. सोबतच कोका आणि नागझिरा अभयारण्य लागून असल्याने यांना जोडणारा रिंग रोड बनविण्यात आल्यास जंगल क्षेत्राला पर्यटनाची अधिक जोड मिळेल. गोरेवाडाच्या धर्तीवर मिनी प्राणी संग्रहालय देण्यात यावे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात नागरिकांना प्राण गमावले लागत आहेत त्याकरिता जंगल क्षेत्राला फेन्सिंगचे प्रस्ताव शासन दरबारी पडले आहेत त्यांना तात्काळ मंजुरी प्रदान करणे यावेळी चर्चा करण्यात आली.


0 टिप्पण्या