शालेय विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड: भारतीय स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासानिमित्त तसेच केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘हर घर तिरंगा आणि‘वंदे मातरम राष्ट्रव्यापी मोहीम मोठ्या उत्साहात राबवली जात आहे. या अभियानाचा एक मुख्य भाग म्हणून सोमवार दि.१० ऑगस्ट २०२६ रोजी महापालिकेच्या माता गुजरीजी विसावा उद्यान येथे विशेष *तिरंगा आणि वंदे मातरम* माहिती प्रदर्शन' आयोजित करण्यात आले होते.
या प्रदर्शनाचे रीतसर उद्घाटन *महापौर सौ.कविता संतोष मुळे* यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे,* महिला बाल कल्याण उपसभापती सौ.निरंजना राजु लांडगे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त गंगाधर ईरलोड, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, नगरसेवक अशिष नेरलकर, काळे पाटील, कविता गड्डम, नगरेवक प्रतिनिधी कुलदिप राक्षसमारे, शिक्षणधिकारी प्रविणा मांदळे, उद्यान अधिक्षक डॉ.मिर्झा बेग यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने व वंदे मातरम या गिताने करण्यात आली. या प्रदर्शनात भारताचा राष्ट्रध्वज 'तिरंगा' कसा उत्क्रांत झाला, त्याची रचना कोणी केली आणि सुरुवातीपासून आजपर्यंतच्या ध्वजाचे विविध टप्पे चित्रांच्या व माहिती फलकांच्या माध्यमातून मांडण्यात आले होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीकारकांसाठी स्फूर्तीस्थान ठरलेल्या 'वंदे मातरम' गीताचा इतिहास, बंकीमचंद्र चॅटर्जी यांचे योगदान आणि या गीताचे देशाच्या एकात्मतेमधील स्थान दर्शवणारे विशेष दालन येथे उभारण्यात आले होते.देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामात मोलाचे योगदान देणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्याची माहिती या प्रदर्शनात देण्यात आली होती.
त्याचप्रमाणे नागरिकांसाठी व विशेषतः तरुण वर्गासाठी 'तिरंगा सेल्फी पॉईंट' तयार करण्यात आला होता. येथे नागरिकांनी व शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजासोबत सेल्फी काढून तो harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड केला.
*चौकट*
*तिरंगा ही आपली अस्मिता, प्रत्येक घरावर तिरंगा फडकवा! — महापौर*
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि 'हर घर तिरंगा' अभियान हा प्रत्येक नागरिकाच्या राष्ट्रभक्तीचा उत्सव आहे. महापालिकेने आयोजित केलेल्या 'तिरंगा व वंदे मातरम' प्रदर्शनातून आजच्या युवा पिढीला आपल्या गौरवशाली इतिहासाची प्रेरणा मिळेल. आपला राष्ट्रध्वज ही आपली अस्मिता आहे. माझी सर्व नांदेडवासीयांना विनंती आहे की, १० ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत प्रत्येकाने आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकवावा आणि राष्ट्रध्वजाचा मान राखावा!"
या प्रदर्शनाला शहरातील शाळकरी विद्यार्थी, महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन आपली राष्ट्रभक्ती व्यक्त केली. "महानगरपालिकेचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, यामुळे नवीन पिढीला देशाच्या इतिहासाची आणि राष्ट्रध्वजाच्या सन्मानाची महत्त्वाची माहिती मिळाली," अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.


0 टिप्पण्या