प्रतिनिधी ✍️ राजेश येसेकर
चंद्रपूर : दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC) व GSK ब्लड बँक, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन, वरोरा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला विद्यार्थ्यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश राठोड, डॉ. धनश्री पंचभाई, लेफ्टनंट प्रा.संदीप पारखी तसेच प्रा. लता आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होत्या.
रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक कार्य असून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व मोठे आहे. विद्यार्थ्यांमध्ये रक्तदानाची भावना, सामाजिक जाणीव आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी निर्माण व्हावी, हा शिबिराचा प्रमुख उद्देश होता. यावेळी एकूण 51 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. रक्तदानामुळे एखाद्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचविण्यास मदत होऊ शकते, त्यामुळे युवकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.
शिबिरादरम्यान GSK ब्लड बँक, नागपूरच्या वैद्यकीय पथकाने रक्तदात्यांची आवश्यक तपासणी करून रक्त संकलन केले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचे कौतुक करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या स्वयंसेवकांनी शिबिराच्या नियोजनापासून ते व्यवस्थापनापर्यंत विविध जबाबदाऱ्या पार पाडत शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयाच्या वतीने सर्व रक्तदाते, वैद्यकीय पथक, स्वयंसेवक व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले.


0 टिप्पण्या