चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली : फ्युचर पोदार लर्न स्कूल जांभळी सडक येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी निवड झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाचा पदग्रहण समारंभ पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संचालिका नमिता तुमसरे यांच्या सह शाळेचे प्राचार्य निकेशन देऊरमल्ले, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधींचा पदग्रहण समारंभ पार पडला. हेड बॉय श्याद भुरा, उप हेड बॉय स्वयंम गिरी, हेड गर्ल अनन्या भिमटे उप हेड गर्ल कस्तुरी हुकरे विद्यार्थी, एक्वा हाऊस कॅप्टन दृष्टी परसगडे, सिद्धी पवार, इग्निस हाऊस कॅप्टन नुरवी चकोले, कुवीरा हलमारे, टेरा हाऊस कॅप्टन वेनिया इंगळे, ताशी मुटकूरे, वेंटस हाऊस कॅप्टन लावण्या शेंडे, सान्वी बैस, क्रीडा प्रमुख सुजल अग्रवाल, सांस्कृतिक प्रमुख आराध्या कोरे आणि भाषा व शिस्त प्रमुख आध्या वडेटवार यांना पदचिन्हे व बॅज प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य निकेशन देऊरमल्ले यांनी नवनिर्वाचित मंत्रिमंडळाला शाळेची शिस्त, प्रतिष्ठा आणि संस्कार यांचे जतन करण्याची तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची शपथ दिली. यावेळी प्रमुख अतिथी सौ. नमिता तुमसरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “नेतृत्व म्हणजे केवळ पद नव्हे, तर जबाबदारी स्वीकारून इतरांना योग्य दिशा देणे होय.” त्यांनी विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सहकार्याची भावना अंगीकारावी, असे आवाहन केले. प्राचार्य निकेशन देऊरमल्ले यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधींचे अभिनंदन केले. त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना आपल्या पदाचा उपयोग शाळेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी करण्याचा सल्ला दिला. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने नेतृत्वगुण विकसित करून भविष्यात देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले संपूर्ण कार्यक्रमात शिस्त, उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते. नवनिर्वाचित प्रतिनिधींच्या चेहऱ्यावर नवीन जबाबदारी स्वीकारल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाच्या वतीने प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापक, शिक्षक आणि उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या पदग्रहण समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, शिस्त, जबाबदारी, आत्मविश्वास आणि सेवाभाव या गुणांना प्रोत्साहन मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिन्सी बावनकुळे व सामोर्न लुईस यांनी केले तर आभारप्रदर्शन समन्वयक राजीव समरीत यांनी केले.


0 टिप्पण्या