वरोरा प्रतिनिधी ✍️ होमराज घुमे
वरोरा : स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि वरोरा पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई करत अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका इसमाला अटक केली आहे. त्याच्याकडून मॅग्झीनसह एक पिस्टल जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा आणि वरोरा पोलिसांचे गुन्हे शोध पथक वरोरा शहरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी मित्र चौक परिसरातील संतोष दादाजी सेलोकार वय ४८ याने आपल्या राहत्या घरी विनापरवाना अग्निशस्त्र बाळगल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सेलोकार यांच्या घरावर धाड टाकली. घराची झडती घेतली असता पोलिसांना मॅग्झीनसह एक पिस्टल आढळून आले. पोलिसांनी अग्निशस्त्र जप्त करून संतोष सेलोकार याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने हे पिस्टल आपल्याला मित्र चौकातीलच नातेवाईक देवा नौकरकार आणि त्याची पत्नी सौ. भाग्यश्री देवा नौकरकार यांनी आणून दिल्याचे सांगितले. या दोघांविरोधात देखील गुन्ह्यात नाव आल्याने पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिस्टलचा वापर आणि त्याची पुरवठा साखळी काय आहे याचा तपास वरोरा पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के, सहायक पोलीस निरीक्षक शरद भस्मे, सपोनि चौधरी आणि पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.
पोलिसांच्या या कारवाईमुळे वरोरा शहरात अवैधरित्या अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आगामी काळात पोलिसांकडून अशा प्रकारच्या आणखी कारवाया होण्याची शक्यता आहे.


0 टिप्पण्या