Ticker

6/recent/ticker-posts

शासनाकडून बूट न मिळाल्याने माजी विद्यार्थ्याची धाव; डॉ. दिलीप अंबादे यांच्याकडून विद्यार्थ्यांना बूटांची भेट


चित्रा न्युज प्रतिनिधी 
पोहरा :-स्वातंत्र्यदिनाचा उत्साह देशभर पाहायला मिळत असतानाच, स्थानिक प्रशासनाचा अनास्थेचा कारभार मात्र पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शासनाकडून अद्याप विद्यार्थ्यांचे बूट न पोहोचल्याची बाब समोर आल्यानंतर, याच शाळेचे माजी विद्यार्थी तथा माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप अंबादे यांनी तत्परता दाखवत सर्व विद्यार्थ्यांना स्वखर्चाने बूट भेट दिले आहेत. त्यांच्या या सामाजिक दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शासनाकडून दरवर्षी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व शूज-सॉक्स पुरवण्याची घोषणा केली जाते. परंतु, शैक्षणिक सत्र सुरू होऊन इतके दिवस उलटले तरी पोहरा येथील शाळा व्यवस्थापनाला शासनाकडून बूट उपलब्ध झाले नव्हते. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी डॉ. दिलीप अंबादे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांच्या हे लक्षात आले की, अनेक लहानग्या विद्यार्थ्यांकडे पायात घालण्यासाठी बूट उपलब्ध नाहीत.
       विद्यार्थ्यांची ही अडचण आणि गरज लक्षात घेऊन डॉ. अंबादे यांनी त्वरित निर्णय घेतला व शाळेतील सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्याकडून बूट घेऊन देण्याची घोषणा केली. ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यांनी सर्व चिमुकल्यांना बूट वितरित केले.    आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांनी थेट पायातील बुटांची सोय केली, हे पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरले होते.


माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार ठरतोय दिशादर्शक

आपल्या मातृसंस्थेचे आणि शाळेचे ऋण फेडण्यासाठी अनेक माजी विद्यार्थी पुढे येत आहेत. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक वृद्धीसाठी माजी विद्यार्थ्यांनी असाच पुढाकार घेणे काळाची गरज बनली आहे. डॉ. दिलीप अंबादे यांच्या या कृतीमुळे केवळ विद्यार्थ्यांची सोय झाली नाही, तर इतर माजी विद्यार्थ्यांनाही शाळेच्या प्रगतीत हातभार लावण्याची प्रेरणा मिळाली आहे.
          याप्रसंगी शाळेतील शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी संघांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. अंबादे यांच्या या संवेदनशीलतेबद्दल आणि दातृत्वाबद्दल शाळा प्रशासन व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या