सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894
अलिबाग:- दि.01 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त प्रकल्प संचालक महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटी, वडाळा मुंबई यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, संजय माने यांच्या नियोजनानुसार डिसेंबर महिन्यात जिल्ह्यामध्ये एचआयव्ही जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षीची जागतिक एड्स दिन ची थीम Equalize (आपली एकता आपली समानता एचआयव्ही सहज जगणाऱ्यांकरिता) आहे. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग व लायन्स क्लब श्रीबाग तसेच अलिबाग तालुक्यातील विविध महाविद्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने दि.01 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9.30 वा. जनजागृतीपर प्रभात फेरीचे नियोजन करण्यात आले आहे. ही प्रभातफेरी सकाळी 9.00 वाजता जिल्हा रुग्णालय या ठिकाणावरून सुरुवात करून एस.टी.स्टॅन्ड ते शिवाजी चौक, बालाजी नाका ते जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी समारोप होणार आहे. या प्रभात फेरीत शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी फलक व घोषवाक्यासह सहभागी होणार आहेत. प्रभात फेरीच्या सुरुवातीस जिल्हा रुग्णालयात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना एचआयव्ही एड्स बाबतचे मार्गदर्शन व प्रतिबंधाकरिताची शपथ दिली जाणार आहे. दि.01 डिसेंबर जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकीतून आर.सी.एफ.थळ या कंपनीकडून एआरटी केंद्र अलिबाग यांना एआरटी औषधें हस्तांतरित करण्यात येणार आहेत.
युवावर्गामध्ये जनजागृती करण्यासाठी पोस्टर्स स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा विषय भेदभाव व कलंक मिटवून समानता आणणे असा आहे. दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांक रुपये 1 हजार 100/-, द्वितीय क्रमांक रुपये 800/- व तृतीय क्रमांक रुपये 600/- असे दिले जाणार आहे.
पूर्ण डिसेंबर महिन्यात जिल्ह्याभरातील विविध महाविद्यालयात एचआयव्ही/एड्स विषयी मूलभूत माहिती, कलंक आणि भेदभाव, एचआयव्हीचा प्रतिबंध, एचआयव्ही संसर्गितांसाठी सेवा सुविधा एचआयव्ही व सकारात्मक जीवनशैली, एचआयव्हीमुळे देशाच्या विकासावर होणारा परिणाम, एचआयव्ही संदर्भात तरुणांची भूमिका व जबाबदारी, एचआयव्ही तपासणी आणि औषध उपचार अशा विविध विषयांवर विविध महाविद्यालयांमध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे.
शहरात विविध गर्दीच्या ठिकाणी सर्व साधारण जनतेमध्ये एचआयव्ही एड्स जनजागृतीकरिता दि.01 ते दि.15 डिसेंबर 2022 दरम्यान पोस्टर प्रदर्शन आयोजन करण्यात येणार आहे.
अति जोखमीच्या गटात एचआयव्ही एड्सबाबत जनजागृती करिता विविध लक्ष गट जसे बांधकाम कामगार, हॉटेल कामगार, घरेलू कामगार, महिला, पुरुष स्थानिक रिक्षा वाहक, चालक यांच्याकरिता जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडिया स्थानिक केबलवाहिनी, या ठिकाणी मुलाखती देऊन सर्वसाधारण जनतेमध्ये याच्या एचआयव्ही बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. शहरात गर्दीच्या ठिकाणी होर्डिंग प्रदर्शित करणे व भिंतीवर जनजागृती संदेश रंगविणे इत्यादी विविध माध्यमातुन माहे डिसेंबर महिन्यात विविध गटांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उपलब्ध सुविधा व सुविधा केंद्रांची माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. जागतिक एड्स दिन दि.01 डिसेंबर निमित्ताने आयोजित प्रभात फेरीमध्ये तसेच जनजागृती पोस्टर स्पर्धा व रांगोळी स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड अलिबाग डॉ.सुहास माने यांनी केले आहे.
01 डिसेंबर जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग रायगड अंतर्गत रायगड जिल्ह्यातील कार्यरत असणाऱ्या व मागील सन 2021-22 मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्ह्याधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांच्याहस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. याच दिवशी ओएनजीसी कंपनी उरण यांच्यामार्फत तेथील अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता तेथील प्रशिक्षण केंद्रामध्ये एचआयव्ही विषयी माहिती मार्गदर्श, प्रदर्शन करण्यात येणार आहे.
दि.03 डिसेंबर 2022 रोजी रायगड जिल्ह्यातील सर्व समुपदेशक यांची आढावा सभा घेऊन संपूर्ण जिल्ह्यात एचआयव्हीपर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच दि. 05 डिसेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांकरिता एस.एम.वडके महाविद्यालय चोंढी येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच महाविद्यालयामध्ये दि.06 डिसेंबर 2022 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच पी.एन.पी. कॉलेज एन.एस.एस.कॅम्प यांच्यामार्फत नागाव येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबीरामध्ये एचआयव्ही विषयी माहिती समुपदेशन, चाचणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दि.07 डिसेंबर 2022 रोजी जे.एन.पी.टी. हॉस्पिटल उरण येथे तेथील अधिकारी व कर्मचारी यांचे सेन्सटायझेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. दि.08 डिसेंबर 2022 रोजी जे.एस.एम. कॉलेज एन.एस.एस.कॅम्प यांच्यामार्फत मानीभुते येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबीरामध्ये एचआयव्ही विषयी माहिती समुपदेशन, चाचणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


0 टिप्पण्या